जळगाव : सध्या सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची (fodder) चिंता मिटली आहार. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) भडगाव तालुक्यात सध्या पावसामुळे शेताचे बांधबंधारे, डोंगराळ भाग, डोंगर पायथा हिरवे गवत व तणांनी हिरवेगार झाले आहे. त्यामुळे हिरव्या गवताचा घास मिळत असून पशुधनासाठी ते उपयुक्त ठरत आहे. तालुक्यात खरीप हंगामाची पिके हिरवळीने बहरली आहेत. त्याचप्रमाणे डोंगर पायथा, दऱ्या-खोऱ्या आणि माळरान, शेताच्या बांधावर हिरवेगार गवत उगवले आहे.
पावसाचे दमदार (Rain) आगमन झाले असल्याने चहूबाजूला गवताचा चारा उपलब्ध झाला आहे. हिरवा चारा, गवत जनावरांना मुबलक प्रमाणात मिळत आहे. त्यात पावसामुळे पाण्याचे तलाव साचल्याने जनावरांना पिण्याचे पाणीही मुबलक मिळत आहे. कपाशी, मका, सोयाबीन, केळी यासह पिकांच्या हिरवे तण, गवत निंदणीतून जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होत आहे. त्यात मूग, उडीद, शेंगाची तोडणी रानोमाळ सुरू असल्याने या पिकाचा हिरवा चाराही सध्या उपलब्ध होत आहे.
शेतकरी, पशुमालक हिरवा चारा बैलगाडी, दुचाकीवरून वाहताना दिसत आहेत. दररोज हा हिरवा चारा शेतांमधून गावातील गोठ्यांमध्ये आणला जात आहे. शेतात कपाशीसह इतर पिकांची बैलजोडीने मशागतीचे काम केल्यावर दररोज जनावरांना शेताच्या बांधावरील हिरव्या गवताचा चारा मिळत असल्याने जनावरांनाही अच्छे दिन आले आहेत. शेतांमध्ये पिके असल्याने बांधावर शेळ्या चरताना दिसून येतात. छोट्या मोठ्या झाडांवर, हिरवळीने बहरलेल्या हिरव्या वेलींची पाने खाताना शेळ्या नजरेस पडत आहेत. सध्या डोंगरांवर, डोंगर पायथ्याशी हिरव्या गवतांनी जणू सजले आहेत. याच डोंगरांवर, डोंगर पायथ्याशी शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल आदी जनावरे चरून भूक भागवतात. हिरवा चारा हा जनावरांसाठी आवडीचे खाद्य असल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्न दूर झाला आहे.
गेल्यावर्षी दुष्काळ, यंदा चाऱ्याचा सुकाळगेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने भडगाव तालुक्यात दुष्काळ पडला होता. पावसाळ्यातही जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला नव्हता. त्यानंतर उन्हाळ्यातही चाऱ्याचे हाल झाले. यंदा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चारा मोठ्या प्रमाणात उगवला असून जोडीला रिमझिम पावसामुळे शेतात तणही उगवले आहे. हे तणही जनावरांना चारा म्हणून उपयोगात येत आहे. यंदा चाऱ्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी समाधानी आहेत. जोडीला पाण्याचा प्रश्नही यंदा मिटला आहे.