नाशिक : दोन वर्षापूर्वी दुधाचे संकलन (Milk Collection) ५०० लिटर इतके होते, तर आजमितीस ३५०० लीटर दुधाचे संकलन, पारंपरिक शेतीसोबत आता भाजीपाला शेतीची सांगड तसेच वनबंधाऱ्यातून (KT Dam) भूजल पातळी वाढली. या सगळ्या गोष्टी काठीपाड्यात घडून आल्या. हे शक्य झाले ते मिशन भगीरथ या उपक्रमामुळे.
नाशिक जिल्हा (Nashik Zilha Parishad) परिषदेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिशन भागीरथ (Mission Bhagirath) प्रयास हा उपक्रम २०२२ साली उपक्रम सुरु करण्यात आला. कायम पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणाऱ्या गांवांमधील भूजल पातळी वाढावी हा हे उपक्रमामागील हेतु होता. या उपक्रमांतर्गत सुरगाणा (Surgana) तालुक्यातील काठीपाडा या ग्रुप ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती.
काठीपाडा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या लगतच्या गावांमध्ये मिशन भागीरथ प्रयास उपक्रमांतर्गत दोन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांच्या निर्मितीतुन गत वर्षात काठीपाडा गावातील भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भूजल पातळी वाढल्याने शेती व पूरक व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला असून दोन वर्षा पूर्वी काठीपाडा गावातून दुभत्या जनावरांचे ५०० लीटर दुधाचे संकलन होत होते, आता मात्र याच गावातून ३५०० लीटर दुधाचे संकलन होत आहे.
शेती उद्योगास चालना
काठीपाडा गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा भातशेती आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतात दुबार पीक घेतले जात नव्हते, यामुळे रोजगारासाठी गावातील नागरिक स्थलांतरण करीत होते. मिशन भागीरथ प्रयास उपक्रमामुळे गावात भूजल पातळी वाढल्याने आता मात्र भात शेती बरोबरच गावकरी टोमॅटो, काकडी, पालेभाज्या यांचे उत्पादन घेत आहेत. यामुळे शेती उद्योगास चालना मिळाली आहे. शेतकर्यांना बारमाही काम मिळाल्यामुळे स्थलांतरण कमी झाले आहे. हे सर्व मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे शक्य झाले असल्याचे गावकर्यांचे मत आहे.
मिशन भागीरथ प्रयास उपक्रमामुळे भूजल पातळी वाढली आणि त्यामुळे शेती आणि पूरक व्यवसायांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. सुरगाणा तालुक्यात अजुन बंधारे बांधल्यास पाणी संकट दूर होऊन सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.- रोहिणी चंद्रकांत वाघेरे, सरपंच, काठीपाडा
मिशन भागीरथ प्रयास उपक्रमाच्या माध्यमातुन जिल्ह्यात 307 बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या बंधाऱ्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणास होत आहे. या वर्षात मिशन भागीरथ प्रयासच्या माध्यमातून दोनशे बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नागरिकांनी देखील मनरेगा योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आपल्या गावात जलसंधारणाची कामे करावी.- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक