Join us

Paddy Harvesting : पारंपरिक भात मळणीसाठी खळे कसे तयार करतात? जाणून घ्या सविस्तर 

By गोकुळ पवार | Published: November 12, 2024 12:59 PM

Paddy Harvesting : भात मळणीसाठी कुणी मशीन, तर कुणी हाताने झोडपणी करून तर कुणी खळ्यावर बैलांच्या साहाय्याने मळणी करत आहेत. 

Paddy Harvesting :  नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) भात पट्ट्यात भात सोंगणीची लगबग सुरु आहे. ऐन दिवाळीत भात सोंगणीला सुरवात झाल्यानंतर काही शेतकरी शेतातच भात रचून ठेवत आहेत. काही शेतकरी पावसाच्या भीतीने थेट खळ्यावर आणून मळणी करत आहेत. भात मळणीसाठी कुणी मशीन, तर कुणी हाताने झोडपणी करून तर कुणी खळ्यावर बैलांच्या साहाय्याने मळणी करत आहेत. 

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होत असून पारंपरिक शेती करण्याची पद्धत लोप पावत असल्याचे चित्र आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत यंत्रसामग्री आल्याने जुन्या पद्धती मागे पडत आहेत. मात्र आजही काही भागात जुन्या आणि नैसर्गिक पद्धतीनेच शेती कामे करण्यावर भर दिला जात आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे भात मळणीसाठी तयार केले जाणारे खळे. हे खळे हल्ली दिसून येत नाही, मात्र नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात आजही भात पिकासह, नागली, वरई व रब्बी पिकांच्या (Rabbi Season Crops) मळणीसाठी खळ्याचा वापर केला जातो. 

तर सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात भात कापणीला (Paddy Harvesting) वेग आला आहे. भात कापल्यानंतर रचून ठेवले जाते. मग काही शेतकरी शेतातच तर काही शेतकरी खळे केलेल्या जागेवर उडवे करून ठेवतात, म्हणजे रचून ठेवतात. याच खळ्यावर इतरही शेतकरी एकत्र येऊन भाताची उडवी रचतात. तसेच खळे करण्यासाठी एकत्र काम करतात. जेणेकरून एकाच जागेवर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांची पिकांची मळणी करता येईल. आता भात काढणीचे बहुतेक काम यंत्र, हार्वेस्टरने होऊ लागल्याने शेतकऱ्यांची श्रम करण्याची सवय कमी झाली आहे.

खळे कसे तयार करतात? 

खळे तयार करण्यासाठी घराजवळ, शेताजवळची जागा ठरवली जाते. खळ्याच्या जागेवरील गवत, खडे काढून जागा स्वच्छ करून खळ्याच्या मध्यभागी (लाकडी खांब) रोवला जातो. जेणेकरून त्याच्याभोवती बैल फिरवून मळणी करता येईल. सुरवातीला खळे शेणाने सारवून घेतले जाते. त्यानंतर भात मळणीसाठी भाताचे भारे खळ्यावर आणून ठेवले जातात. खळ्यात कापलेले भात पीक पसरून मळणी केली जाते. पहाटे किंवा रात्री मध्यभागी रोवलेल्या लाकडी खांबाभोवती बैल बांधले जातात. ते खळ्यातील कापलेल्या भातावर पेंढयावर गोलाकार फिरतात. बैलांच्या गोलाकार फिरण्याने धान्यांचे दाणे वेगळे झाले की भाताचा पेंढा वेगळा केल्यानंतर वाऱ्याच्या वेगानुसार उंचावर उभे राहत धान्य उफणले जाते. 

यांत्रिक पद्धतीने भात मळणी परवडत नाही. शिवाय बैलांना खाण्याजोगा चाराही त्यातून मिळत नाही. अशा पद्धतीने मळणी केल्यास बैलांना उपयुक्त असा चारा मिळतो. शिवाय दोन तीन शेतकरी एकत्र येत असल्याने वेळेची श्रमाची बचत होते. त्यामुळे आजही आम्ही भात मळणीसाठी खळे तयार करतो आणि भात पिकांबरोबरच नागली, वरई पिकांचीही मळणी इथेच करतो. - चंदर भोये, शेतकरी, त्र्यंबकेश्वर 

हेही वाचा : Little Millat Harvesting : आदिवासी पट्ट्यात वरई सोंगणी कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर 

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीनाशिक