Join us

Agriculture News : अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाने शेतीचं नुकसान, भरपाईसाठी निवेदन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 6:44 PM

Agriculture News : राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Agriculture News : राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही शेतीचे नुकसान झाले असून याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

साधारण 17 ऑक्टोंबरपासून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वादळी पाऊस सुरु आहे. सततच्या वादळी पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाममधील काढणीला आलेले सोयाबीन, मका, कापूस, लाल कांदासह विविध पिकांचे नुकसान (crop Damage) झाले. त्याचे तत्काळ महसूल खात्याकडून व पीकविमा कंपनीकडून पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, असे निवेदन दिले. 

त्याचबरोबर शासनाकडून शेतकऱ्यांना व महिलांना मिळणारे किसान सन्मान योजना, पीकविमा नुकसानभरपाई तसेच लाडकी बहीण योजनेचे मिळणारे अनुदान सरकारी बँका अवैधरित्या परस्पर कर्ज खात्यात जमा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिलांची फसवणूक होत आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदर शेतकऱ्यांची व महिलांची बँकांकडून होणारी लूट बंद थांबवावी, तसेच सदर बँकांना हे अनुदानाचे पैसे लाभधारक शेतकरी व महिलांना तत्काळ देण्याचे आदेश द्यावेत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

आंदोलनाचा इशारा 

सद्यस्थितीत अनेक भागात पावसाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर तात्काळ निर्णय न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर निवडणूक आचारसंहिता काळात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीअहिल्यानगरपाऊसपीक विमा