Join us

Cotton Cultivation : कापसाचे 30 टक्के उत्पादन वाढविणारी सघन पद्धत आहे तरी काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 4:31 PM

Cotton Cultivation : जळगाव जिल्ह्यात यंदा ६६ हेक्टर क्षेत्रावर 'सघन' पद्धतीने कापसाची लागवड करण्यात आली आहे. 

जळगाव : बदलत्या वातावरणामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton production) घट होत आहे. त्यावर पर्याय म्हणून करण्यात आलेल्या संशोधनानंतर 'सघन' लागवडीचा धागा गवसला. गेल्यावर्षी जिल्ह्यात केवळ ८.३२ हेक्टर क्षेत्रात 'सघन' पद्धतीने कापसाची लागवड झाली. ही पद्धत फळास आल्याने उत्पादनात भरघोस वाढ झाली आणि उत्पादक या पद्धतीच्या लागवडीच्या प्रेमात पडला. म्हणूनच यंदा ६६ हेक्टर क्षेत्रावर 'सघन' पद्धतीने कापसाची लागवड करण्यात आली आहे. 

वातावरणातील अनियमितता, पावसाच्या स्थितीसह अन्य कारणांमुळे सध्या जिल्ह्यात कापूस लागवडीच्या तुलनेत उत्पादन कमी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर पर्याय म्हणून केंद्रीय कापूस संस्था व म.फुले राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत विज्ञान केंद्राच्या ममुराबाद फार्ममधील समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद जाधव, मयुरी देशमुख, आशिष पवार या संशोधकांनी उत्पादकांना अन्य पर्यायही सुचविले. मात्र उत्पादकांच्या मनातून कापूस लागवडीविषयीचे प्रेम कमी झाले नाही. म्हणून या संशोधकांनी अन्य पर्याय निवडीसाठी प्रयोग सुरु केले. या प्रयोगातून 'सघन' पद्धतीने लागवड केल्यानंतर उत्पादनात वाढ आणि कापसाचा पोतही उंचावत असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे सघन लागवड पद्धती?कपाशीच्या शिफारशीत लागवड पद्धतीत झाडांची संख्या प्रति हेक्‍टरी 50 ते 55 हजार तर बीटी वा संकरित वाणात हेक्‍टरी 15 हजार झाडे असतात; मात्र सघन पद्धतीत सरळ वाणांची 45 x 15 सें.मी. अंतरावर लागवड करून प्रति हेक्‍टरी दीड लाख झाडे बसतात, असे सांगण्यात येते. शिफारशीत पद्धतीपेक्षा या सघन पद्धतीत झाडांची संख्या अधिक असल्याने कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. या पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची कायिक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडांचा आकार मोठा मिळून उत्तम प्रतीचा कापूस निघत असल्याचे सांगितले जाते. 

सघन पद्धतीचे फायदे? पारंपारिक लागवडीपेक्षा या पद्धतीत कोरडवाहू कपाशीचे उत्पादन २० ते ३० टक्के वाढते, कापूस पिकात यांत्रिक वेचणीही शक्य होते. कापसाचे पीक १५० दिवसात संपल्यानंतर सिंचनाच्या मदतीतून रब्बी हंगामात अन्य पिके घेता येतात. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व त्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच कापसाची वेचणी होते. म्हणून नुकसानीसह फवारणीचाही खर्च खळतो. 

सघन व कमी अंतरावर कापसाची लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृतता निर्माण होताना दिसत आहे. म्हणूनच गतवर्षांपेक्षा यंदा लागवडीत चांगली वाढ झाली आहे. -डॉ. शरद जाधव, विशेषज्ञ, कृषी विद्या, ममुराबाद केंद्र. 

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रशेतीलागवड, मशागत