Jamin Mojani : जमीन मोजणी (Land Measurement) अतिशय महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे अतिशय अचूक पद्धतीने जमिनीची मोजणी केली जाते. यासाठी अनेकदा खासगी व्यक्तीच्या माध्यमातून मोजणी केली जाते. तर सरकारी जमीन मोजणी सुद्धा होत असते. यास विलंब लागत असल्याचे शेतकरी सांगतात. जमिनीची मोजणी (Jamin Mojni) आणि तिचे प्रकार याबाबत या लेखातून समजून घेऊ...
जमीन मोजणीसाठी अर्ज कोठे करावा
आपणास आपली जमीन मोजणीसाठी (Jamin Mojani Application) अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित अर्ज सर्व शेत जमिनीच्या कागदपत्रांसह सादर करावा लागेल. तसेच कुठली मोजणी करावयाची आहे. त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत जसे की उदा. कागदपत्रे मोजणीकामी आवश्यक कागदपत्रे ही -
१) तलाठी यांचेकडील चालू ७/१२ उतारा.
२) ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्याचा कच्चा बिनस्केली नकाशा.
३) रहिवासी पुरावा व ७/१२ उतारावरील नमूद सर्व धारकांचे आधारकार्ड व पत्रव्यवहाराचा पत्ता.
४) मोजणी फी चलन भरलेबाबतचे मूळ चलन व झेराक्स.
मोजणी प्रक्रिया
अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टरवर त्याची नोंद करून त्या अर्जाला एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर कार्यालयीन कार्यवाही पार पडल्यानंतर संपूर्ण फाईल मोजणी करणाऱ्या सर्वेअरकडे दिली जाते. हा सर्वेअर अर्ज करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या जमिनीच्या चारही बाजूंनी असणाऱ्या शेजाऱ्यांना मोजणीच्या कमीत कमी १५ दिवस अगोदर नोटीस पाठवून मोजणीची तारीख कळवतो. आज-काल सर्व जमिनीच्या मोजणी या प्लेन टेबल पद्धतीचा उपयोग करून केल्या जातात.
जमीन खालीवर असल्यास किंवा ओढ्या नाल्याची असल्यास तिचे आकारमान प्लेन टेबल पद्धतीने अचूक काढले जाते. मोजणीच्या दिवशी एखादा शेजारील शेतकरी व्यक्ती जर गैरहजर राहिला तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरीमध्ये देखील मोजणी करता येते. मात्र मोजणी ज्या दिवशी करण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस त्या शेतकऱ्यास दिली गेली असणे गरजेचे आहे. ही बाब आपण त लक्षात ठेवली पाहिजे.
मोजणीचे प्रकार पुढीलप्रमाणे
१) साधी
२) तातडीची
३) अति तातडीची व
४) अतिअतितातडीची मोजणी
असे मोजणीचे प्रकार असतात व त्यानुसार मोजणीची फी ठरते. साधारणतः साधी मोजणी १८० दिवसांत, तातडीची मोजणी १२० दिवसात तर अति तातडीची मोजणी ६० दिवसात तर अतिअति तातडीची मोजणी ही १० दिवसात केली जाते. मोजणीचे वेळी स्वतः किंवा आपण नेमून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे. मोजणीसाठी आवश्यक सामग्री व वस्तू जमविणे व मोजणीसाठी मदत करणे हे आजूबाजूचे सर्व शेत जमीनधारकांचे कर्तव्य आहे. मोजणी करताना संपूर्ण गटाची वा सर्व्हे नंबरची मोजणी करावी.
मोजणीचे प्रमुख प्रकार
- हद्द कायम मोजणी
- पोटहिस्सा मोजणी
- भूसंपादन संयुक्त मोजणी
- कोर्टवाटप मोजणी
- कोर्टकमिशन मोजणी
- बिनशेती मोजणी
- निमताना मोजणी
- सुपर निमताना मोजणी
- ई मोजणी
असे प्रमुख प्रकार आहेत. आपणा सर्वांना वरील मोजणीचे प्रकार म्हणजे काय आहेत, याची कल्पना असेलच पण निमताना मोजणी व सुपर निमताना मोजणी हे प्रकार नवीन असतील तर चला निमताना मोजणी व सुपर निमताना मोजणी याबाबत अधिक जाणून घेवूयात.
निमताना व सुपर निमताना मोजणी म्हणजे काय ?
मोजणी झाली आणि सव्र्व्हेअर यांनी हद्दीच्या खुणा दाखवल्या आणि अशी मोजणी मान्य नसेल तर त्याविरुद्ध अपील दाखल करता येते. असे अपील आपण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे दाखल करू शकतो आणि त्यानंतर तालुका निरीक्षक यांचे तर्फे ही मोजणी केली जाते आणि त्यास निमताना मोजणी असे म्हणतात. सुपर निमताना मोजणी जर आपल्याला निमताना मोजणी मान्य नसेल तर त्या मोजणीवर देखील अपील केले जाते. असे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केले जाते त्यास सुपर निमताना मोजणी असे म्हणतात.
- ऍड. वैजनाथ वांजरखेडे, कायदे अभ्यासक तथा मोडी लिपी भाषांतरकार (संपर्क : ९९७००१३३४३)