Join us

Kisan Ki Baat : 'मन की बात'च्या धर्तीवर 'किसान की बात' कार्यक्रम, सप्टेंबरपासून सुरवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 4:02 PM

Kisan Ki Baat : 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाच्या धर्तीवर 'किसान की बात' कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Kisan Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' (Man Ki Baat) रेडिओ कार्यक्रमाच्या धर्तीवर 'किसान की बात' (Kisan Ki Baat)  कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञ आणि विभागाचे अधिकारी रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या सप्टेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान (Agriculture Minister Shivrajsingh Chauhan) यांनी दिली. 

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांना उत्तरे देण्यासाठी दर महिन्यात एकदा ‘किसान की बात’ हा कार्यक्रम सुरु करणार आहोत. हा कार्यक्रम रेडिओ आणि टीव्ही या दोन्ही माध्यमातून सुरु होणार आहे. रेडिओद्वारे प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात वैज्ञानिक सहभागी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील तसेच ते स्वतः देखील असतील आणि त्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती पुरवण्यात येईल. कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांशी संपूर्णतः जोडले जाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर किसान की बात कार्यक्रमातून शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात चर्चा घडवून आणल्या जातील. 

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी देशातील प्रत्येक गावातून शेतकरी बांधव आले आहेत. शेतकरी हा देशाचा आणि जनतेच्या हृदयाचा जणू  ठोका आहे. शेतकऱ्यांच्या पेरलेल्या पिकांमुळे सर्व देश आपले पोट भरत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्यासाठी देव आहे. अन्नदात्याला सुखी आणि समृद्ध करायचे आहे.

सप्टेंबर महिन्यापासून कार्यक्रम

याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करण्याचे सूचित केले आहे. कारण अनेक वेळा शेतकऱ्यांकडे माहिती नसल्याने ते चुकीचे कीटकनाशक वापरतात. त्यामुळे कृषी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर विविध विषयावर मार्गदर्शन करणारे शास्रज्ञ शेतकऱ्यांना हवी ती माहिती पुरवतील. महिन्यातून एकदा हा कार्यक्रम होणार असून येत्या सप्टेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशिवराज सिंह चौहानमन की बात