Agriculture News :चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) शंकरपूर येथील मकराच्या बैलाचा पोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध पावला आहे. हा पोळा बघण्यासाठी दूर धरून हजारो लोक येत असतात. शेतकऱ्यांचा पारंपरिक सण म्हणून पोळा सणाकडे बघितले जाते. शंकरपूर येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे मकराचा बैल निघत असून, हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
आज महाराष्ट्रात सर्वदूर बैलपोळा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने अनेक गावगावच्या परंपरेनुसार पोळा साजरा करण्याच्या प्रथा आहे. अशीच एक परंपरा शंकरपूर गावात देखील साजरी केळी जाते. १९३० पासून असलेली ही परंपरा आजही येथील देशमुख या कुटुंबीयांनी सुरू ठेवली असून, यात ग्रामपंचायतला या परिवाराने सहभागी करून घेतले आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, हा मकराचा बैल जुन्या काळात देशमुख वाड्यातून निघत होता. त्यानंतर, देशमुख परिवारांनी आपली सर्व जमीन डहाके परिवाराला विकल्यानंतर डहाके परिवारातर्फे हा मकराचा बैल काढण्यात येतो.
या मकराच्या बैलाबद्दल अशी माहिती आहे की, १९३० च्या सुमारास शंकरपूर येथे गाय बैल व इतर पाळीव जनावरावर आजाराची साथ आली होती. त्यामुळे देशमुख परिवाराला एका महाराजांनी ही साथ कमी करण्यासाठी शंकरपूरच्या संपूर्ण सीमेवर बैल व त्याच्या डोक्यावर मकर घेऊन फिरविले होते, तेव्हा ही साथ कमी झाली होती. तेव्हापासून हा मकराचा बैल पोळाच्या सणाच्या दिवशी मिरवणुकीच्या माध्यमातून निघत असतो. तेव्हापासूनची परंपरा आजही कायम आहे.
असा असतो मकर
हा मकर षटकोनी आकाराचा असून, लाकडापासून बनविलेला आहे. या मकरात दिवे लावले जात असून, हा मकर बैलाच्या शिंगावर ठेवला जातो आणि विधीवत पूजा केली जाते. हा सजविलेला मकर बैल प्रथम हनुमान मंदिर व तेथून बाजार चौकातील मैदानात आणला जातो. तिथे मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा केली जाते व तिथून मग गावाच्या मध्यभागी तोरण बांधले जाते. या तोरणाजवळ मकराचा बैल समोर व इतर बैल त्याच्यामागे येत असतात. मकराचा बैल तोरणाखाली आला की, तोरण तोडले जाते व पोळा फुटला, असे गृहित धरल्या जाते, असा हा आकर्षक पोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे