Join us

Agriculture News : नाफेड कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशीची मागणी, क्षत्रिय महासभेचे निवेदन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 6:50 PM

Agriculture News : नाफेड (Nafed) आणि एनसीसीएफ द्वारे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात आली.

Agriculture News :  केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड (Nafed) आणि एनसीसीएफ द्वारे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात आली. मात्र या कांदा खरेदीत बोगस शेतकरी दाखवून खरेदी करण्यात आली. त्यामुळे नाफेडचा कांदा घोटाळा जगजाहीर झाला. त्याचबरोबर सरकारला वाटतंय कि, आम्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत आहोत, मात्र काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर बदलल्याने दुसऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जात असल्याचा आरोप करत अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या माध्यमातून नाफेडच्या कांदा खरेदीची ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

नाफेडचा कांदा खरेदी (Nafed Onion Scam) घोटाळा चांगलाच चर्चेत आहे. अनेक शेतकरी संघटनाच्या माध्यमातून या खरेदीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आता कुर्मी क्षत्रिय महासभेने या कांदा खरेदीवर आक्षेप घेतला आहे. तसेच या घोटाळ्याची कसून चौकशी करावी असेही सांगण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन दिले असून पुढील काही मागण्या करण्यात आल्या आहेत. 

  • नाफेड आणि एनसीसीएफने पाच वर्षांत कांदा खरेदीची चौकशी करण्यात यावी. 
  • कांदा खरेदी करताना त्याचे वजन केले जाते, त्याच्या वजनाच्या स्लिपवर तारीख व वेळ लिहिलेली असावी व वजन तपासावे.
  • शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की अन्य कुणाच्या खात्यात गेले याचीही चौकशी व्हायला हवी.
  • कांदा वाहतूक आणि कांदा पोते खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
  • ज्या उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांनी खरोखरच चांगले काम केले असेल तर त्यांचा योग्य तो सन्मान दिला पाहिजे.
  • कांद्याचा भाव पोर्टलवर आला, त्याच दिवशी शेतकऱ्यांना भाव मिळाला आहे का, हे तपासावे लागेल का?
  • कांदा खरेदी करताना तो उत्तम दर्जाचा राहतो, पण तो सरकारला देताना तो एवढा निकृष्ट कसा होतो, याची चौकशी व्हायला हवी.
  • केंद्र सरकारला ग्राहकांसाठी कांदा खरेदी करायचा असेल तर थेट एपीएमसी आणि नाफेडच्या वतीने खरेदी करावी. ती खरेदी उत्पादक कंपनी बाजाराबाहेर करत आहे.
  • नाफेडचे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याच्या साठवणुकीसाठी सर्वात मोठे गोदाम असून, त्या ठिकाणी एक किलोही कांदा ठेवला गेला नाही, तर सरकार खासगी जागेत कांदा साठवून नेमकं काय साध्य करत आहे, त्याची चौकशी करावी. 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेती