Join us

Agriculture News : वीज चोरी करून शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कारवाई, महावितरणचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 3:33 PM

Agriculture News : वन्यप्राण्यांकडून पिकांची होणारी नासाडी थांबविण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे.

Agriculture News : सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची काढणी सुरु आहे. तत्पूर्वीच वन्यप्राण्यांकडून पिकांची होणारी नासाडी थांबविण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 

मागील काही महिन्यांपासून विजेचा शॉक (Electric Shock) लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, काही शेतकरी पिकाच्या (Farming) संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतकऱ्यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीज चोरीबरोबर सदोष मनुष्यवध यासारख्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर थोपण्याचा आणि महावितरणकडून भरपाई मागण्याचा कल देखील दिसून येत आहे.

भरारी पथक शेतशिवारात घालणार गस्त

वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी, तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारांत गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रकार आढळला तर संबंधित शेतकऱ्यावर विद्युत कायदा २००३ च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी..

आकडे टाकून वीजचोरी करून शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्याला यापुढे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून संभाव्य जीवितहानीची शक्यता असते. याबाबत फौजदारी गुन्हाही नोंदविला जाऊ शकतो, याची दखल घेत शेतकऱ्यांनी स्वतः या प्रकारामध्ये सहभागी होऊ नये. तसेच कोणी सहभागी होत असल्यास त्याला तसे करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन देखील महावितरणने केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीभारनियमन