Join us

Nashik District Bank : आधी जमीन जप्ती, मग लिलाव, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसा देणं सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:11 PM

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत.

Nashik Farmers : नाशिक जिल्हा बँकेकडून (Nashik District Bank) कर्जदार शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात असल्याने जिल्हा बँकेच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून शेतकरी कृती समितीच्यावतीने आंदोलन सुरू आहे. नांदगाव तालुक्यातील नऊ शेतकऱ्यांना बँकेने जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. थकबाकीदार कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा येत असल्याने शेतकरी आक्रमक असतानाच पुन्हा नोटीस सत्र सुरू झाल्याने नाराजी वाढली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik Farmers) जवळपास ६२ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यात सुरवातीला शेतकऱ्यांची जमीन जप्ती केली जात असून नंतर थेट जमिनीचा लिलाव केला जात आहे. बँकेने काही दिवसांपूर्वीच वसुली सुरूच राहाणार असल्याचे जाहीर करून थकबाकीदारांना भरणा करण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनेकदा कर्ज वसुलीच्या नोटिसा देऊनदेखील ज्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली होत नाही अशा नऊ शेतकऱ्यांच्या जमिनीसह इतर मालमत्तेची जप्ती करण्याची अखेरची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. 

दरम्यान ११ ऑक्टोबर रोजी या शेतकऱ्यांच्या मालमत्तेची लिलावात जमिनीसह इतर बोली लागणार आहे. तेव्हा संबंधित शेतकरी हे भीतीच्या वातावरणात असून आता पुढे काय होणार? या कारणाने चिंताग्रस्त परिस्थितीत आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी हे कर्ज सन २०१४ मध्ये घेतलेले आहे आणि आता त्याला जवळपास दहा वर्षे होत असूनही कर्ज परतफेड होत नसल्याने जिल्हा बँकेने हा कारवाईचा बडगा उचलला आहे. 

कर्ज वसुलीसाठी जप्ती नोटिसा

गेल्या दहा वर्षांत तालुक्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अस्मानी व सुलतानी संकट येत राहिल्याने शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न हे कमी प्रमाणात झाले. त्याचप्रमाणे मध्यंतरी कोरोना काळात झालेले नुकसान आणि त्यातच नांदगाव तालुक्यातील दुष्काळ या सर्व कारणांमुळे शेतकरी हे कर्ज फेडू शकले नाहीत. संबंधित शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जप्ती नोटिसा बजावल्याने नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेकडे अनेक ग्राहकांच्या ठेवी आहेत आणि आम्ही अनेक शेतकऱ्यांना कर्जे दिलेली आहेत. मात्र कर्ज वसुली होत नसल्याने ठेवीदारांनासुद्धा त्यांची रक्कम देऊ शकत नसल्याने जप्तीची कारवाई करावी लागत आहे. - मांगीलाल डंबाळे, विभागीय अधिकारी नाशिक जिल्हा बँक..

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकबँकशेतकरी