नाशिक : कंदीलपुष्प (खरचुडी) 'सिरोपेजिया अंजनेरिका' ही झुडूपवर्गीय वनस्पतीची प्रजाती त्र्यंबकेश्वरजवळील (Trimbakeshwer) अंजनेरी गडावर आढळून येते. अंजनेरी गड हे या प्रजातीचे अधिवास क्षेत्र आहे. ही प्रजाती संकटग्रस्त असून, तिचे संवर्धन काळाची गरज आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ही वनस्पती फुलते. यामुळे अंजनेरी (Anjneri Fort) गड चढताना सावधगिरी बाळगायला हवी, असे मत निसर्गप्रेमी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' (आययुसीएन) च्या इको सेन्सिटिव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटामध्ये अभ्यास करणाऱ्या चमूने 'खरचुडी' म्हणजेच कंदीलपुष्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या काही प्रजातींना 'संकटग्रस्त' म्हणून घोषित केले आहे. या अंजनेरी गडावर या प्रजातीच्या कुळातील सेरोपेजिया लावी ही देखील वनस्पती आढळते. अंजेनरी संवर्धन राखीव क्षेत्रासाठी वनविभागाने स्थापन केलेली 'अंजनेरी मॅनेजमेंट समिती' कागदावरच आहे. त्या समितीची इतक्या वर्षामध्ये कधीही बैठक वनखात्याने घेतली नाही, हे विशेष.
संवेदनशीलता अन् शिस्त हवीच
ट्रेकिंगला सह्याद्रीच्या गड, किल्ल्यांच्या वाटा चढणाऱ्या हौशी मंडळींकडूनसुद्धा अनेकदा अशा दुर्मीळ वनस्पती ज्ञात व अज्ञातपणे पायाखाली तुडविल्या जातात. यामुळे धोका निर्माण होतो. गड-किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांनीदेखील निसर्गाविषयी संवेदन- शीलता जोपासायला हवी, असे मत सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक तथा अभ्यासक प्रतीक मोरे यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियावरील 'ट्रेंड' घातकच!
रानभाज्या, वेली, कंद खाण्याचे सल्ले अलीकडे सोशल मीडियावर फार दिले जात आहेत; मात्र हा ट्रेंड' सुद्धा घातक ठरू पाहत असल्याचे निसर्ग अभ्यासकांचे म्हणणे आहे. शहरी लोक गावपाड्यांवर जाऊन तेथील भाज्या व कंदाच्या नावाखाली जर अत्यंत दुर्मीळ वनस्पतीचा 'घात' करत असतील तर ते थांबवयाला हवे, कारण आता 'सिरोपेजिया अंजनेरिका' ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
स्थानिक नागरिकांसोबत वनविभागानेसुद्धा अंजनेरिका वनस्पतीच्या संवर्धनाची प्रामाणिकपणे काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पुढाकार घेऊन गडावरील काही क्षेत्र अभ्यासअंती ओळखून तो भाग लोकांसाठी प्रतिबंधित करायला हवा. गडावर मर्यादित लोकांना सोडायला हवे. त्यांना कठोर शब्दांत सूचना द्यायला हव्या. गडावर लोकांच्या कृतीवर 'वॉच' हवा. अन्यथा नाशिकचे निसर्गवैभव असलेली सिरोपेजिया अंजनेरिका व तिला पोषक असलेली तेथील जैवविविधता लुप्त होईल अन् ते कळणारसुद्धा नाही.
- जुई पेठे, पर्यावरण वा वनस्पतीशास्त्र अभ्यासक, नाशिक