Join us

Cotton Subsidy : 'ही' कागदपत्रे सोबत ठेवा, कापूस, सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 5:49 PM

Cotton Subsidy : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक 88 हजार 139 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Agriculture News : खरीप हंगामात 2023-24 मध्ये कापूससोयाबीन उत्पादक (cotton Subsidy) शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सहानुग्रह अनुदान म्हणून हेक्टरी 5000 रुपये अनुदान मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सोयाबीनकापूस उत्पादक 88 हजार 139 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र, सहमती पत्र व आधार कार्ड देणे आवश्यक आहे, असे आवाहन वैजापूर (Chatrapati Sambhajinagar) तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी केले आहे.  गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा मोबदला म्हणून राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत 10000 रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम फक्त सोयाबीन आणि कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पाणी केली आहे, अशा शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आयुक्त जमावबंदी पुणे यांच्याकडून आयुक्त कृषी पुणे यांना प्राप्त झाले असून त्या याद्या प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकामार्फत ग्रामपंचायतला लावण्याचे काम करण्यात आले आहे. 

दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाही याचा अर्थ त्यांनी ई पीक पाणी केली नाही असा होतो, तरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे, यादीमध्ये नाव नाही, अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केल्याचा पुरावा जोडून तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. त्यानंतर वरिष्ठ  स्तरावरून जो काही निर्णय होईल, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल असे ठक्के यांनी सांगितले. सध्या ज्यांचे नाव यादीमध्ये आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे सामायिक खातेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र व वैयक्तिक खातेदार असल्यास संमती पत्र सोबत आधार कार्ड झेरॉक्स वर स्वतः स्वाक्षरी करून प्रत जोडून देणे आहे. यासाठी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर किंवा इतरत्र जाऊन कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. 

कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन 

तसेच संमती पत्र व ना हरकत प्रमाणपत्र आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांचेकडून प्राप्त करून घेणे, कोणत्याही आफवावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहणी करूनच पुढील कार्यवाही करावी, ज्यांची नावे यादीत आहेत, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील कृषी सहाय्यकांना कागदपत्रे देणे, जेणेकरुन त्यांच्या आधारलिंक खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया करणे सोईचे होईल. शासनाची ही योजना यशस्वीपणे राबवून लवकरात लवकर अनुदान प्राप्त करून घ्यावी, अशी आवाहन करण्यात आले आहे. 

आवश्यक कागदपत्रे जे सामायिक खातेदार आहेत, अशा शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र व आधारकार्ड  झेरॉक्स जोडून देणे गरजेचे आहे. वैयक्तिक खातेदार असेल तर संमती पत्र व आधार कार्ड झेरॉक्स देणे गरजेचे आहे. 

तालुक्यात एकूण ईपीक पाहणी केलेले कापूस संयुक्त खातेदार 14 हजार 750, कापूस वैयक्तिक 55 हजार 585, सोयाबीन संयुक्त 3468 व सोयाबीन वयक्तिक 14366 असे तालुक्यातील एकूण 88 हजार 139 शेतकऱ्यांना अंदाजे 25 कोटी अर्थसहाय मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांना तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र व संमती पत्र जोडून द्यावे. शेतकऱ्यांनी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रात व अन्य ठिकाणी जाऊन स्वतःची फसगत करून घेऊ नये व कोणी अशी फसवणुक करीत असेल तर तात्काळ संपर्क करा. - व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसराज्य सरकारशेतीसोयाबीन