नाशिक : नाफेड, एनसीसीएफच्या (NAFED) मागील पाच वर्षांतील कांदा खरेदीची (Nafed Onion Scam) महाघोटाळ्याची सीबीआय, ईडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी. तसेच शेतकऱ्याच्या शेती मालाला निर्यात बंदी करू नये, शेतमालावर निर्यातीला (Export Duty) निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य लावू नये यासह इतर शेतकरी हिताचे ठराव मराठा-कुणबी महासभा अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली
अखिल भारतीय कुर्मी (मराठा कुणबी) क्षत्रीय महासभेचे (Maratha Kunabi Mahasabha) महाराष्ट्र राज्य अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे रविवार 6 ऑक्टोबर.होत आहे. अधिवेशनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा कुणबी बांधवांना कुर्मी भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार.आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. कार्यक्रमात अनेक ठराव मांडण्यात येणार असून यात भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा, नाफेड, एनसीसीएफ या दोन संस्थांच्या कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशी व्हावी, शेत मालाला निर्यात बंदी करू नये. शेतमालावर निर्यातीला ड्युटी, एमएपी.सुद्धा लावू नये, असे ठराव मांडण्यात येणार आहे.
तसेच शेतकऱ्याला करण्यात येणाऱ्या अल्प मुदत बिनव्याजी कर्जाची रक्कम दुप्पट करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यक्तींना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, तसेच वयाच्या ७५ वर्षांवरील व्यक्तींना रेल्वे प्रवासात संपूर्ण सवलत मिळावी. मराठा -कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावे, म्हणून जी शिष्यवृत्ती दिली जाते, त्याचा लक्षांक पाच पट करण्यात यावा. कृषीमाल उद्योगावर आधारित उद्योग वसाहती वसवून शेतकऱ्यांना उद्योगी बनवावे, हे ठराव अधिवेशनात मंजूर करून भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना हे ठराव दिले जाणार आहेत.
मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत मागील पाच वर्षात नाफेड, एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात आला. मात्र खरंच या संस्थांच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यात आला का? ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच या अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाणार आहे. या कांदा खरेदी घोटाळ्याची सीबीआय, ईडीमार्फत सखोल चौकशी करावी, कांदा निर्यात बंदी, एमएपी ड्युटी यासारखे शेतीला घातक ठरणारे निर्णय घेऊ नये, यासाठी ठराव मांडण्याचा प्रयत्न असणार आहे.
- निवृत्ती न्याहारकर, मराठा कुणबी महासभा, जिल्हाध्यक्ष, नाशिक