नाशिक : जिल्ह्यात फार्मर आयडीसाठी (Farmer ID) नोंदणीला दुसऱ्या टप्प्यात मुदत वाढवून देखील केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी काढले आहे. २८ फेब्रुवारी ही फार्मर आयडी नोंदणीसाठी अखेरची मुदत होती. कृषी विभागाने गावागावात फार्मर आयडी नोंदणी करावी यासाठी जनजागृती केली. नोंदणीसाठी स्वतंत्र केंद्र सुरू केले. मात्र १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांपैकी केवळ ४ लाख ९ हजार शेतकऱ्यांनीच फार्मर आयडीसाठी (Farmer ID Registration) ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले.
त्यामुळे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरीकृषी योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी पुन्हा अखेरची संधी देण्यात आली आहे. फार्मर आयडी बनविताना सर्व्हर डाउनची (Server Down) समस्या जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत सतावली असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. १४ फेब्रुवारी अखेरपर्यंत २ लाख ७७ हजार ९१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले होते. पुढच्या १४ दिवसांत केवळ सव्वा लाख शेतकरीच फार्मर आयडीसाठी नोंदणी करू शकले. या १४ दिवसांत फक्त १० टक्के नोंदणी वाढली. हे प्रमाण कृषी विभागाला ७० टक्के अपेक्षित होते.
यासाठी महत्त्वाचा आयडी
शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभमिळतो. शेतकऱ्यांची ओळख आणि त्यांच्या जमिनीची माहिती यांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना आधार कार्डशी संलग्न ११ अंकी विशिष्ट किसान आयडी नोंदणीनंतर दिला जातो.
ज्याच्या नावावर जमीन त्याला फार्मर आयडी
ज्याच्च्या नावावर जमीन असेल त्याला फार्मर आयडी कार्ड मिळते. हे कार्ड केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केले. या कार्डाद्वारे शेतकरी विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मिळते.
आदिवासी शेतकरी पुढे
जिल्ह्यात येवला, पेठ व सुरगाणा या तीन तालुक्यांत फार्मर आयडीचे काम ३९ टक्के म्हणजे इतर तालुक्यांच्या मानाने चांगले झाले आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत
मालेगाव तालुक्यात सर्वाधिक फार्मर आयडी काढले गेले होते. नंतर मालेगाव तालुक्यात थंड प्रतिसाद मिळाला. आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी सर्वाधिक नोंदणी केलेली आहे.