नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCM University) दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या 51 किलो बियाणातून 20 हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे यांच्या उपस्थितीत हे सिडबॉल विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत येथील जंगलात फेकण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे म्हणाले की, “ जागतिक पातळीवर आज पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांने एका वृक्षाचे संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धन करण्यास मदत होईल व जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर शोधण्यास हातभार लागेल. जल, जंगल आणि जमिन हा आदिवासींच्या आस्थेचा विषय आहे. देशी प्रजातीच्या वृक्षांचे सवर्धन झाल्यास पर्यावरणाची हानी टाळता येईल. यासाठी अश्वमेध सामाजिक संस्थेने हा उपक्रम स्तुत्य आहे”.
हिरडा, बेहेडा, आवळा, बांबू, शिसम, पळस, बेल या सारख्या 21 प्रकारच्या देशी वृक्षांच्या बियाणांचा वापर करून घनशेत येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने “आपले पर्यावरण आपल्या हाती” या उपक्रमांतर्गत अश्वमेध सामाजिक संस्थेच्यावतीने सिडबॉल तयार करून घेण्यात आले होते. या प्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी विद्यापीठाच्यावतीने घनशेत करीयर अकॅडमीला एक अद्ययावत असा संगणक भेट दिला. विद्यापीठाने यापुर्वीही घनशेत येथे विविध उपक्रम राबविले आहे.
या उपक्रमास घनशेतचे सरपंच रवी चौधरी, माजी सरपंच कैलास चौधरी, ग्रामस्थ मनोज शिताड व इतर, मुख्याध्यापक सोनवणे, हिरकुड, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक कैलास मोरे, संपर्क अधिकारी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी केले. तर सुत्रसंचालन हिरकुडसर यांनी आणि आभार सरपंच रवी चौधरी यांनी मानले.