नाशिक :खरीप हंगामातील (Kharip Season) भात, नागली, वरई या पिकांच्या काढणीला वेग आला आहे. ऐन दिवाळीतही या पिकांच्या काढणीची कामे सुरूच होती. नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात सर्वसाधारण नागलीबरोबर शितोळी नागलीचे पीकही (Raggi Crop) जोमदार आले आहे. शितोळी नागली म्हणजे पांढरी नागली काढणीला आली असून या नागलीची काढणी देखील सुरु झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर हे आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात दरीखोरीत, मुरबाड जमिनीत, निसर्गाच्या सानिध्यात आदिवासी शेतकरी बांधव पुर्वीपासून पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या पीकांची शेती करतात. त्यामध्ये भात, नागली, वरई, जोंधळा (ज्वारी) ही पीक मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी ठरली आहेत. त्यात 'नागली म्हणजेच एक प्रकारचे निसर्गपूजक असलेले पीक. याच नागलीतील शितोळी नावाने ओळखली जाणारी पांढरी नागलीची शेती केली जाते.
उन्हाळ्यात झाडांच्या तोडलेल्या फांद्या, वाळलेला पालापाचोळा, गवत याचे एकत्रित मिश्रण तयार करून जमिनीची भाजणी केली जाते. जुन महिन्यात पेरणी केली जाते. भाजून काढलेल्या जमिनीवर भरदार रोप तयार होते. साधारण ऑगस्ट महिन्यात कमी पावसाच्या सरी पडत असल्यास शितोळी पीकासाठी जमिनीची नांगरणी करून लागवड केली जाते. हिरवीगार पात पाहून रानातील पांढरे, लाल ससे पीकाची पाती खाण्यासाठी कातरतात. या नागलीची कणसं लाल असतात आणि शितोळी नागलीची कणसं पांढरी असतात हे पीक आदिवासी भागातही दुर्मिळ होत चालले आहे.
शितोळी नागली पीक बहरले....
या पिकाला सप्टेंबर महिन्यात कणसं येतात. कणसाला बलंगी म्हणतात. नोव्हेंबर महिन्यात कणसं काढली जातात. कणसं साठवण्यासाठी बांबूच्या नाहरापासून विणलेली लहान झिलकी किंवा मोठा झिला त्याला पाटी म्हणतात. त्यात साठवली जाते. तर मळणी हिवाळ्यात केली जाते. उन्हात कणसं वाळत घातले जातात, नंतर ट्रॅक्टर फिरवतात किंवा लाकडी दांडक्याने कुटतात. यंदा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे ही पीक कणसांनी बहरून आले आहे.
हेही वाचा : Rabbi Season : रब्बी हंगामासाठी बियाणे, खत खरेदी करताना अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर