- वसंत खेडेकर
कधी काळी प्रत्येक घरी आवश्यक असणाऱ्या गृहोपयोगी वस्तू आजच्या यांत्रिकी युगात दिसेनाशा झाल्या आहेत. त्यांचे अस्तित्व आज नसले तरीही त्या वस्तू आपल्या नावारूपाने मात्र आजही कायम आहेत. त्यांची नावे या ना त्या प्रकारे घेतली जातातच! मुसळ, ही वस्तू त्यातीलच एक महत्त्वाची! पण आज मुसळ दिसेनासे झाले आहे.
भरपूर जोराचा आणि टपोऱ्या थेंबांचा संततधार पाऊस पडल्यानंतर त्याचे वर्णन मुसळधार पाऊस, असा केला जातो. शासकीय यंत्रणा, वृत्तपत्र आणि टीव्ही आदींच्या वृत्त वाहिन्यांतील पावसाच्या बातम्यांमधून मुसळधार या शब्दाचा प्रयोग नित्य होत असतो. मुळात, कितीही जोराचा असला तरीही पावसाच्या धारा मुसळा एवढ्या आकाराच्या पडत नाहीत; पण तरीही मुसळधार असे म्हणण्याची रीत पडली आहे व ती रीत वर्षानुवर्षे चालत येत आहे. पावसाच्या निमित्ताने सर्वत्र (हिंदीत मुसलदार) मुसळाचे याप्रकारे नाव घेतले जाते; आज मुसळाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. एकेकाळी घर तिथे मुसळ, असे होते.
मुसळाचा घरी नित्य उपयोग होई. धान व अन्य कोणतेही धान्य मुसळानेच कुटले जात. पूर्वी धान दळण्याकरिता आजच्या एवढ्या चक्क्या नव्हत्या. त्याकरिता खूप दूर जावे लागे. यादरम्यान मुसळाने धानाला कुटून त्यातून तांदूळ घेतले जाई. वजनी आणि टिकाऊ अशा शीशम जातीच्या लाकडापासून मुसळ बनविला जातो. उंची चार-साडेचार फूट आणि त्याचा व्यास साधारणतः तीन-चार इंच एवढा असतो. त्याच्या दोन्ही टोकांना लोखंडी पट्टे बसवून दोन्ही टोकांना मजबूत केल्या जाते. जेणेकरून, ते चांगले टिकले पाहिजे आणि धान्यावर त्याचा जबर दणका बसावा. धान्य भरडणे जात्यावर आणि धान्य कुटणे मुसळाने असे
जुन्या काळी चाले.
घरावर ठेवलं जात असे...
दगडी पाटा तसेच मुसळ या दोन वस्तू आजही दूरवरच्या डोंगररांगांच्या खेड्यांमधील घरांमध्ये हमखास दिसून येतात. शहरांमध्ये या वस्तूंचे अस्तित्व फारसे नाही. त्यातील मुसळ, मुसळधार पावसाच्या उल्लेखाने नेहमी कानावर पडत असतो. एवढेच! वादळी आणि गडगडटाने जोराचा पाऊस सुरू असताना, आकाशी वीज आपल्या घरावर पडू नये, याकरिता गाव व खेड्यांमध्ये अंगणात लोखंडी धातूंच्या विडा, पावशी, कुर्हाड यासोबतच दोन्ही टोकांना लोखंडी पट्ट्या लावून असल्यामुळे मुसळ ठेवण्यात येत असे.