गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भाताचे उत्पादन (Bhat Production) इतर पिकांपेक्षा जास्त केले जाते. अर्थात पूर्वीपेक्षा भातशेती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी कापणीनंतर भात घरी आणून तीन ते चार महिने झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दरवाढ होण्याच्या प्रतीक्षेत अजूनही भाताची विक्री केलेली नाही. मात्र, सध्याच्या वाढत्या उन्हामुळे (Summer Hot) भाताचे वजन किमान १० टक्क्यांनी म्हणजेच क्विंटलमागे १० किलोने घटत असल्याने त्या शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.
प्रतिकूल हवामान, ढगाळ वातावरण आणि अतिवृष्टी यांचा सामना करत भातशेती केली जाते. अनेकजण आपल्याला वर्षभर पुरेल व पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून आवश्यक भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात. मात्र, कमी दराने भात खरेदी (Rice Buying) केली जात असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत भाताची विक्री करणे टाळले, मात्र, आता उन्हाचा फटका त्या भाताला सहन करावा लागत आहे.
पत्र्याच्या घरातल्या भाताला दणका ?
हिवाळ्यात दिवसा कमी झालेली आर्द्रता रात्री कायम होते. त्यामुळे वजन स्थिर राहते. कोरड्या हवामानामुळे भाताची आर्द्रता कमी होत असून, ती पूर्ववत होत नसल्याने व भाताचे वजन घटते. पत्र्याचे छत असलेल्या घरांत भाताचे वजन घटण्याचे प्रमाण अधिक असते.
१४ टक्के आर्द्रता
हिवाळ्यात भाताची आर्द्रता १३ ते १४ टक्के वाढते. अधिक दिवस झाले की ती कमी होते. उन्हाची तीव्रता वाढताच आर्द्रता कमी होत असल्याने भाताच्या वजनाचे प्रमाण सरासरी आठ ते नऊ टक्क्यांवर येऊन भाताचे वजन कमी होते. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते. घरातच भाताचे वजन होत असल्याने वजन घटत असून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.
स्लॅब, कौलारू घरात भात झाले थंड
स्लॅब किंवा कौलारू घरात थंडावा राहत असला तरी कोरड्या हवामानाने कमी झालेली भाताची पत पूर्ववत होत नाही. त्यामुळे वजनातील घट अटळ असते. दरवाढीच्या प्रतीक्षेत भात साठवून ठेवला तरी वजन कमी होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते, चार महिने झाले तरीही काहींचे घर भाताने भरले आहे. दिवसेंदिवस भाताचे वजन कमी होत आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे.