Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी सुवर्ण समृद्धी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात विविध स्टॉलसह विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी या सप्ताहात जवळपास शंभर एकरसाठीच्या ज्वारी बियाण्यांची विक्री करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर बियाण्यांसह जैविक कीटकनाशकांची देखील विक्री झाली आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापुर येथे कृषि सुवर्ण समृध्दी सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. या सप्ताहाचा समारोप कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर (KVK Tondapur) येथे अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला. समारोप प्रसंगी कृषी यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, गोकृपा अमृत, बायो डायनॅमिक कम्पोस्ट निर्मिती, शेती पालन, कुक्कुट पालन अशा अनेक विषयावर चर्चा स्तराचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य मेळावा मध्ये कृषि विज्ञान केंद्र तोंडापुर, येथे उपलब्ध बियाणे व इतर शेती उपयोगी निविष्ठा ज्यामध्ये ज्वारी परभणी शक्ती, ज्वारी परभणी मोती, ज्वारी परभणी सुपर मोती, ज्वारी परभणी वसंत हुरडा, हरभरा बियाने, जीवामृत, ट्रायकोडरमा, मेटाराझीहयम व टर्मरिक बुस्टर विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते. अनेक शेतकरी यांचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते.
विविध प्रशिक्षणाचे आयोजन
या सप्ताहादरम्यान कृषी सुवर्ण समृद्धी रथ वारंगा, चुंचा, फुटाणा पाटी, ताकतोडा, कहाकर, सुनेगाव, खुदनापूर, पार्डी खु, बउर, कांडली, दाती, या गावांमध्ये जाऊन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यपद्धतीची व विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. या कृषी सुवर्ण समृद्धी सप्ताहा दरम्यान कौशल्य विकास अंतर्गत शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या कृषी सुवर्ण समृद्धी सप्ताहाच्या अनुषंगाने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये डॉ. राकेश कुमार सिन्हा अन्न संचालक, नवी दिल्ली, भारतीय श्री अन्न संशोधन संस्थानचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके, वीरशेटी पाटील मिलेट मॅन ऑफ तेलंगणा, परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्र केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.एल.एन जावळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव माने अध्यक्ष, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी मार्गदर्शन केले.