Join us

Agriculture News : शेतीत राबणाऱ्या मजुरांना आता 'इतके' रुपये रोज, दहा वर्षांनंतर वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 7:12 PM

Agriculture News : राज्य शासनाने अधिसूचना जारी केली असून, हे वाढीव दर लागू केले जाणार आहेत.

Agriculture News : देशात दरवर्षी महागाई वाढत असताना कृषी विद्यापीठासह (Agriculture University) इतरही ठिकाणी शेतीकाम करणाऱ्या कामगारांना मात्र दहा वर्षांपूर्वीच्या दरानुसार मजुरी दिली जात आहे. अखेर या पिळवणुकीला आंदोलनातून वाच्या फुटली अन् आता मजुरीचे दर वाढविण्याबाबात राज्य शासनाने अधिसूचना जारी केली असून, हे वाढीव दर दीड महिन्यानंतर लागू केले जाणार आहेत.

‘शेतकी कामधंदा’ या वर्गवारीत मोडणाऱ्या कामगारांना ‘किमान वेतन अधिनियम १९४८’नुसार कामाचा मोबदला (Shet Majuri) दिला जातो. या मजुरीचे दर महाराष्ट्र शासनाने ८ ऑगस्ट २०१४ रोजी निर्धारित केले होते. हे दर प्रत्येक ६ महिन्यांनी सुधारित करण्याचा नियम असताना डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेतात काम करणाऱ्या अतांत्रिक मजुरांना २०१४ पासून आजही केवळ १८० रुपये मजुरी दिली जात होती; परंतु गेल्या दहा वर्षांत महागाई प्रचंड वाढलेली असताना मजुरीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती.

दिनांक १४ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने मजुरी दराच्या पुनर्निर्धारणाची अधिसूचना जारी केली. यात वाढीव मजुरी दराचा मसुदाही प्रसिद्ध करण्यात आला. शेतीत राबणाऱ्या मजुरांना आता १८० ऐवजी ३८० रुपये रोज व मासिक मजुरी करणाऱ्यांना ९ हजार ८३० रुपये मिळतील. या वाढीव दराबाबत दोन महिन्यांत नागरिकांकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या आहेत, तसेच दोन महिन्यांनंतर हा मसुदा विचारात घेतला जाणार आहे.

कृषी विद्यापीठातील मजुरांनी केले हाेते आंदाेलन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV) शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी वेतनवाढीसाठी मागील सप्टेंबरमध्ये अन्नत्याग, काम बंद व रास्ता रोको आंदोलन केले होते. मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी कृषिमंत्री, कामगारमंत्री, कामगार आयुक्त, तसेच राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे लेखी व भ्रमणध्वनीद्वारे याचा पाठपुरावा केला.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डशेतकरी