नाशिक :नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आदिवासी पट्ट्यात हळूहळू रेशीम शेती (Sericulture Farming) बहरू लागली आहे. नुकताच दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील महिला बचत गटाने रेशीम उद्योगाला सुरवात केली असून आता उद्योग उभारणीसाठी शेडचेही काम सुरु झाले आहे. जेमेतेम शिक्षण झालेल्या या महिलांकडून संसाराला हातभार लागावा म्हणून रेशीम शेतीला प्राधान्य दिले आहे.
दिंडोरी तालुक्यातील (Dindori) जेमतेम लोकसंख्या असलेले कोचरगाव येथील हिरकणी बचत गटाच्या महिलांना घरातील पारंपरिक शेतीपेक्षा शाश्वत उत्पादन मिळेल, असा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी रेशीम उद्योगाची निवड केली. जेमतेम शिक्षण असलेल्या महिलांना उद्योगाविषयी कोणतीही माहिती नव्हती. त्यासाठी त्यांनी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट (Abhivyakti) यांच्याकडे प्रशिक्षणाची मागणी केली. सुरुवातीच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतचे सर्व काम बचत गटाच्या महिलाच करणार आहेत.
सध्या वातावरणात झालेल्या कमालीच्या बदलामुळे कोणते पिक घ्यावे, हे कळेनासे झाले आहेत. त्यात अवकाळी पावसाने शेतीच स्वरूप बदलले आहे. अशा परिस्थितीत आपल्या हाताला काम मिळेल व मिळालेल्या कामाला योग्य मोबदला मिळेल असा विश्वास ठेवून रेशीम उद्योग सुरु करण्यात आलेला आहे. या महिलानी १० हजार तुतीच्या झाडांची लागवड केली असून लवकरच रेशीम कोश तयार होण्याची प्रक्रिया सुरु होईल. रेशीम कोश शेडमध्ये चांगल्या प्रतीचे होते व त्याला बाजारात चांगल्या भावाने मागणी असल्याने या उद्योगासाठी एक चांगले शेड बांधून देण्यात येत आहे.
रेशीम शेती कशी केली जाते, त्यासाठी कोश कुठून उपलब्ध केले जातात, तुती लागवड करण्यामागे उद्देश काय असतो, या सगळ्या गोष्टी समजून घेणे महत्वाच्या आहेत. यासाठीच प्रशिक्षण घेतले असून अद्यापही दोन प्रशिक्षणे बाकी असल्याने रेशीम शेतीबाबत बेसिक माहिती मिळू शकलेली आहे. आता याच माहितीच्या आधारे पुढील काळात येथील महिला रेशीम शेती यशस्वीपणे करतील, शिवाय आजूबाजूच्या गाव खेड्यातील महिलांना मार्गदर्शक ठरतील अशी आशा अभिव्यक्तीने व्यक्त केली आहे.
शिक्षण जेमतेम आहे, पण काहीतरी करण्याची धडपड आहे. म्ह्णून रेशीम शेतीचा पर्याय निवडला. आम्हा महिलांचा बचत गट असल्याने संघटन वृत्तीने काम करण्याची कला आहेच, शिवाय रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे, आणखी दोनदा प्रशिक्षण होणे आहे, मात्र आता रेशीम उद्योगासाठीचे शेड बांधून पहिली पायरी पार पाडली जाईल, आगामी काळात रेशीम शेतीसाठी झोकून देऊन काम करू.
- संगीता टोंगारे, अध्यक्षा, हिरकणी महिला बचत गट.