नाशिक :नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा या पिकांची (Nashik Grape Farming) पूर्वापार सर्वत्र ओळख आहे. त्यामध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सुरगाणा तालुक्याची ओळख स्ट्रॉबेरीचा तालुका अशी निर्माण झाली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरीच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये पाच पटींनी वाढ झाली आहे.
सुरगाणा तालुक्यातील (Surgana) पूर्वी भात, वरई, नागली, खुरासणी ही पिके घेतली जात होती. मात्र शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे वळलेले दिसून येत आहेत. लाल रंगाची गोड, आंबट चवीच्या स्ट्रॉबेरीचा हंगाम (Strawberri Farming) वाढत्या थंडीबरोबर बहरायला सुरुवात होते. महत्त्वाचे म्हणजे सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. त्यांच्याकडून सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरीला मागणी मोठ्या प्रमाणात असते.
सन 2017-18 या वर्षामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये 75 एकर क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली गेली होती. मात्र दरवर्षी या पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये 2019-20 मध्ये 225 एकर, 2020-21 मध्ये 350 एकर, 2021-22 मध्ये 400 एकर, 2022-23 मध्ये 430 एकर, तर यंदा म्हणजे 2023-24 मध्ये 440 हेक्टर वर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. याचाच अर्थ सहा वर्षामध्ये पाच पटीने क्षेत्र वाढले असून अधिकाधिक शेतकरी त्याची लागवड करीत आहेत.
एका एकरसाठी 80 हजार रुपये खर्च
साधारणतः एक एकर स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एकरी उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये मिळते. हे पीक येण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. स्ट्रॉबेरी ही नाशवंत असल्याने हे पीक लवकर खराब होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी धावपळ करावी लागते. स्ट्रॉबेरीचे पॅकिंग दोन किलोच्या बॉक्समध्ये केले जाते. अंदाजे प्रत्येक दोन किलोच्या पॅकला 150 ते 200 रुपये दर मिळतो. ही फळे शेजारील गुजरातमध्ये पाठवली जातात.
प्रक्रिया उद्योग व्हावेत..
स्ट्रॉबेरीच्या विंटरडाऊन, सेल्या, राणी, इंटर डाऊन, स्वीट गोल्ड, नाभिया, स्वीट चार्ली, एस ए, कामरोजा, इंटरप्लस, चांडलर, एससी, एस वन या प्रमुख जाती आहेत. त्यांची लागवड या परिसरामध्ये केली जाते. फळ कमी दिवस टिकणारे असल्यामुळे व जवळ मार्केट नसल्यामुळे ते शक्य त्या भावात द्यावे लागते. प्रक्रिया उद्योग करून त्यापासून जाम, ज्यूस किवा आइस्क्रीम फ्लेवर डाय पावडर आदी गोष्टी झाल्या, तर स्ट्रॉबेरी हे पीक भारतीय शेतीला पर्याय आणि व्यावसायिक बळ देणारे ठरेल.
हेही वाचा : Fal Pik Anudan : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून फळपिकांसाठी घ्या इतक्या घटकांसाठी लाभ