भंडारा : सध्या खरीप हंगाम (Rabbi Season) अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांची रब्बी कामांची लगबग वाढली आहे. रब्बी हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहेत. ही सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे हिताचे ठरणारे आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना गाफील राहिल्यास फसवणूक होऊ शकते.
बियाणे, खत व रासायनिक खत (Fertilizer) खरेदीवेळी कुणी व्यावसायिक बिल देण्यास टाळाटाळ करत असल्यास त्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मिळालेले बिल शेतकऱ्यांनी पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, असेही कृषी विभागाने कळविले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना भरपाई (Crop Insurance) मिळण्यास यामुळे मदत होते. शेतकऱ्यांनी यासंबंधी विशेष काळजी घेत रबीचे नियोजन करावे.
आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खत व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. यातून फसवणूक टाळता येते. कुठलीही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. तक्रारीची दखल घेत दोर्षीवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा
पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी
खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेस्टन, पिशवी, टेंग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. एमआर- पीपेक्षा जादा दराने खते, बियाणेच कीटकनाशके खरेदी करू नयेत, कीटक- नाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी.
कृषी अधिकाऱ्यांकडे वेळीच करा तक्रार
शेतकऱ्यांनी, आपल्या कृषी निविष्ठांशी संबंधित तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे नोंदवाव्यात. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून त्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.
सामूहिक खरेदीला प्राधान्य द्यावे
निविष्ठांच्या वैयक्तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामूहिक कृषी निविष्ठांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे. जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही. गटामार्फत सामूहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात बचत होईल. सोबतच दरामध्येही सूट मिळण्याची शक्यता असते.
अधिकृत विक्रेत्याकडून करा
खरेदी शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशक खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पवच्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकरी व विक्रेत्याची स्वाक्षरी आणि मोबाइल क्रमांकाची नोंद करून घ्यावी, पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी.