Chandrapur Golden Wood : देश विदेशात 'गोल्डन वूड' नावाने प्रसिद्ध असलेले बल्लारपूर आगारातील सागवान लाकूड नवीन संसद, उपराष्ट्रपती भवन व अयोध्येतील राममंदिराची शोभा वाढविण्यास उपयुक्त ठरले होते. आता पंतप्रधान कार्यालयाचे सौंदर्य खुलविण्यासाठी येथील लाकडांचा वापर केला जाईल. वन विकास महामंडळाला मिळालेल्या डिमांडनुसार रविवारी हे 'गोल्डन वूड' दिल्लीला रवाना करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरातील वाहतूक विपणन आगार आणि वन विकास महामंडळाच्या आगारातून सागवान लाकूड खरेदी करण्यासाठी देश- विदेशातील व्यापारी येतात. हे लाकूड गडचिरोलीच्या जंगलातील असून भारत मंडपम, केंद्रीय सचिवालय, सातारा सैनिक शाळा, नाशिकचे सप्तशृंगी गड, जळगावचे भारतीय पुरातत्त्व विभाग, दादरा नगर हवेली वन विभाग, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमसाठी अशा अनेक ठिकाणी या लाकडाचा वापर झाला आहे. वर्षानुवर्षे कीड व ऊन-पावसाचा अनिष्ट परिणाम होत नाही, हे या लाकडाचे वैशिष्ट आहे.
लाकडाची वैशिष्ट्ये काय?
सागवान लाकडात तेल व रबराचे प्रमाण अधिक, त्यामुळे पॉलिश करण्याची गरज भासत नाही. पॉलिश केले तर लाकडाला पुन्हा झळाळी येते. त्यामुळे 'गोल्डन वुड' म्हटले जाते. हे लाकूड ६०० वर्षे टिकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
येथे होणार वापर
एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह या पंतप्रधान कार्यालयातील संमेलन कक्ष, द्विपक्षीय चर्चा कक्ष, कॅबिनेट मंत्री सभा कक्ष तसेच प्रधान सचिव कार्यालयात वापर होणार आहे. गुणवत्ता तपासणीनुसार येथील सागवान लाकूड उत्तम दर्जाचे आहे. ३ हजार २० घनफूट लाकूड पाठवू, - गणेश मोटकर, सहायक आगार व्यवस्थापक, एफडीसीएम बल्लारपूर