Join us

Agriculture News : पाणी मागणी अर्ज सादर करताना 'ही' कागदपत्रे आवश्यक, शेतकऱ्यांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 20:50 IST

Agriculture News : रब्बी हंगाम 2024-25 साठी पाणी मागणी अर्ज 3 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत दाखल करावेत.

नाशिक :  उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा कि.मी. 0 ते 110 व पालखेड धरणाच्या (Palkhed Dam) फुगवट्यातील तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, रौळसप्रिंपी, शिरसगाव व सावरगाव त्याचप्रमाणे ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालवा, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव लघु प्रकल्पांतील पाण्याचा लाभ घेणाऱ्या पाणी वापर संस्था व नमुना नंबर 7 चे मागणी धारकांनी  रब्बी हंगाम 2024-25 साठी पाणी मागणी अर्ज 3 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत दाखल करावेत असे आवाहन कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक, अभिजित रौंदळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

रब्बी हंगाम (Rabbi Season) सन 2024-25 (मुदत 15 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025) मध्ये वर उल्लेख केलेल्या व त्यांच्या कालव्याचा समादेश क्षेत्रापैकी स्थापन झालेल्या व कार्यरत असलेल्या पाणी वापर संस्था व उपसा सिंचन परवानगी धारकांसाठी जलाशयात उपलब्ध असलेल्या पाण्यातून बिगर सिंचन आरक्षणाचे  पाणी वजा जाता उर्वरीत पाणी हे रब्बी हंगाम 2024-25 मध्ये संस्थेच्या देय पाणी कोट्यातून निर्धारीत करून एक आवर्तनात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

तसेच प्रकल्पावरील उपसा सिंचन पाणी वापर संस्थांना हंगामातील उभ्या पिकांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी  पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. अधिक पाणी लागणाऱ्या पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे  पिकांचे नुकसान झाल्यास त्याची  सर्वस्वी जबाबदारी  संबधित  लाभधारकांची राहणार आहे. मुदतीनंतर आलेल्या मागणी अर्जांचा विचार केला जाणार नाही किंवा मुदत वाढविली जाणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पाणी अर्ज दाखल करतांना करावयाची पूर्तता

  • पाणी मागणी अर्ज दाखल करतांना संबंधित पाणी वापर संस्थांनी त्यांच्या नावे असलेली सर्व थकबाकी भरणे आवश्यक असून त्याशिवाय पाणी मागणी अर्ज मंजूर केला जाणार नाही.
  • सर्व संबंधीत पाणी वापर संस्थांनी त्यांच्या हद्दीतील शेतचाऱ्या सुस्थितीत ठेवणे अत्यावश्यक आहे. नादुरूस्त शेतचारीतून पाणी पुरवठा केला जाणार नाही. तसेच शेतचारी अभावी पाणी न मिळाल्यास त्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही.
  • पाणी अर्ज दाखल करतांना चालू वर्षाचा सातबाराचे उतारे जोडणे आवश्यक आहे.
  • जलाशयावरील ज्या पाणी वापर संस्थांना उपसा सिंचनाचा परवाना दिलेला आहे, अशा सर्व पाणी वापर संस्थांनी नमुना नं. 7 वर पाणी मागणी दाखल करणे आवश्यक आहे. ज्या पाणी वापर संस्था नमुना नं.7 वर पाणी मागणी अर्ज  विहित मुदतीत दाखल करणार नाहीत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे  व प्रचलित धोरणानुसार  व हंगामात मागणी न करताच त्याच क्षेत्रातील पिकास पाणी घेतल्याचे आढळून आल्यास  ती पाणी वापर संस्था अनधिकृत समजून त्यावर उभ्यापिकाच्या क्षेत्राचा अनाधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • रब्बी हंगाम सन 2023-24 पूर्वी ज्या पाणी वापर संस्था कार्यान्वित झालेल्या आहेत. अशा सर्व संस्थांनी त्यांची पाण्याची मागणी व मागणी क्षेत्र विहीत मुदतीत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावी. सदरची मागणी दाखल करतांना संस्थेच्या नावे असलेली सर्व थकबाकी भरणे बंधनकारक आहे. उशीरा दाखल झालेल्या मागणीचा विचार केला जाणार नाही. 
  • जलाशय नदी काठावर कोणाही लाभधारकाने इलेक्ट्रीक मोटारी अथवा ऑईल इंजिन ठेवून वा पाईप अर्थात डोंगळे टाकून पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये, असे प्रयत्न केल्याचे स्थानिक कालवा अधिका-यांचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 च्या कलम 92 अन्वये त्यांचे इलेक्ट्रीक मोटार, ऑईल इंजिन व पाणीवापर करु नये. तत्संबंधीचे साहित्य जप्त करुन नियमानुसार कार्यवाही करण्यांत येईल. तरी असा कुणीही बिना परवानगी पाणीवापर करू नये.
  • उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी बिगर सिंचन पाणी वापर आरक्षण वजा जाता रब्बी हंगामाचे सिंचनासाठी निर्धारीत केलेल्या पाण्यापेक्षा जादा मागणी दाखल झाल्यास त्या प्रमाणात मागणी क्षेत्रात कपात करण्यात येईल. याची सर्व पाणी वापर संस्थांनी नोंद घ्यावी. पाणी फारच कमी उपलब्ध असल्याने ते अत्यंत काटकसरीने वापरणे बंधनकारक आहे.
  • ही मंजूरी महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 मधील तरतुदी व प्रचलीत शासन धोरणांस अनुसरून राहील. तरी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिकाधिक उत्पादन वाढवावे. तसेच यापुढे मागणी अर्ज दाखल करावयाची मुदत वाढविण्यात येणार नाही. असेही कार्यकारी अभियंता श्री रौंदळ यांनी कळविले आहे. 
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना