Join us

Agriculture News : नाशिक ते मुंबई 55 हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा, तत्पूर्वी शासनाला अल्टिमेटम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 4:38 PM

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटूनही शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. आंदोलनादरम्यान अनेक वेगवगेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली. आता या आंदोलक शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात येऊन ३ सप्टेंबरला मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.     नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला (Farmers Protest) एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी सरकार दखल घेत नाही म्हणून नाशिक ते मुंबई विधान भवन व मंत्रालयाला घेराव घालणार असल्याची माहिती समन्वय समितीचे भगवान बोराडे यांनी दिली. या मोर्चाच्या नियोजन करण्यासाठी वणी, दिंडोरी, मोहबारी, कळवण येथे बैठका घेण्यात आल्या. वणी येथे झालेल्या बैठकीसाठी चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, देवळा, कळवण व सटाणा तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.      दरम्यान मागील बैठकीवेळी आंदोलकांनी १ सप्टेंबर रोजीचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या दरम्यान शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास २ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात सर्व शेतकरी जमून, ट्रॅक्टर गोळा करून ३ सप्टेंबर थेट मुंबईकडे मोर्चा काढण्यात येईल. नाशिकहून मुंबईकडे 55 हजार शेतकऱ्यांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा नेण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपली नादारी घोषित केली आहे. आंदोलन स्थळावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शासनाचे प्रतिनिधी निवेदन देण्यात आले. त्यांच्यासमोरच आंदोलन घोषित करून ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन करण्यात आले. 

गावोगावी थकबाकीदार शेतकऱ्यांशी संवाद     सदरील मोर्चातील जिल्ह्यातील गावोगावी थकबाकीदार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. जिल्ह्यातीलचांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, देवळा, कळवण व सटाणा तालुक्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करून कोणत्या गावातून किती शेतकरी येणार, कशी तयारी करायची याबाबतचे नियोजन सुरु आहे. हा ट्रॅक्टर मोर्चा मुंबई विधानभवन आणि मंत्रालयावर धडकणार असल्याचे समन्वय समितीचे भगवान बोराडे यांनी सांगितले. 

टॅग्स :शेतकरी आंदोलनशेती क्षेत्रशेतीनाशिकशेतकरी संप