Agriculture News : नाशिक (Nashik) येथील गोल्फ क्लब मैदानावर थकबाकीदार शेतकऱ्यांचे १४ महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलकांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक जिल्हयातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार गावोगावी बैठका, चर्चा होत होत्या. या मोर्चासाठी जवळपास हजारो शेतकरी मुंबईला येण्यास तयार झाले होते. मात्र हा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
1 जून 2823 पासून नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात धरणे आंदोलन (Farmer Protest) सुरू आहे. या आंदोलनाला आज 459 दिवस पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात वारंवार शासन दरबारी निवेदने दिली आहेत. मात्र सरकार कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आता थेट ट्रॅक्टर मोर्चाद्वारे मुंबई विधानभवन व मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी शेतकरी तयारी करत होते. मात्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मध्यस्थीने शेतकरी आंदोलन समिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली असल्यामुळे ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात येत आहे. मात्र नाशिक येथील कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरूच राहिल, असे नमूद करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील 55 हजार 596 शेतकऱ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक सक्तीची कर्ज वसुली करत आहे यासाठी थेट शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करून जमीन विक्री न झाल्यास शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व बँकेचे नाव लावण्यात येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 14 महिन्यांपासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे.
अनेकदा या शेतकरी आंदोलकांनी वारंवार निवेदन दिले असून शेतकऱ्यांचे थकबाकी कर्ज माफ करावी या मागणीसाठी ही आंदोलन सुरू आहे. मात्र 14 महिने उलटूनही काही मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट नाशिकहून ट्रॅक्टरने मोर्चा काढून मंत्रालयात घेराव घालण्याचं निवेदन दिले होते. त्यामुळे यात आमदार नरहरी झिरवाळ यांनी संबंधित आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आणि सकारात्मक चर्चा करण्याकरता प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले आणि मागण्या मान्य होतील असेही सांगण्यात आले. यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे यांनी सांगितले.