Join us

Tractor Pola : पोळ्याला 'इथे' भरतो ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:14 PM

Tractor Pola : शेतीत बैलाऐवजी ट्रॅक्टरचा (Tractor In Agriculture) वापर केला जातो. ट्रॅक्टर शेतीत काम करणारा बैल झाला.

Agriculture News : शेतीला यांत्रिकीकरणाची जोड लागली आहे. शेतीत बैलाऐवजी ट्रॅक्टरचा (Tractor In Agriculture) वापर केला जातो. ट्रॅक्टर शेतीत काम करणारा बैल झाला. त्याचीही पूजा केली जावी, या उद्देशाने कुशारी येथे आठ वर्षापासून ट्रॅक्टरचा पोळा कुशारी गावात सुरू केला. यात कुशारी येथील ट्रॅक्टर ग्रुप संघटनेच्या पुढाकाराने हा ट्रॅक्टर पोळा भरविला जातो. आता अलीकडे णज गावात अशा पद्धतीने ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात येते. 

तान्हा पोळ्याच्या दिवशीच ट्रॅक्टरचा पोळा (Tractor Pola) भरवला जातो. ढोल-ताशांच्या गजरात ३ वाजता रॅली काढली जाते. रॅली हनुमान मंदिरात पोहोचल्यावर हनुमंतांची पूजा केली जाते. त्यानंतर सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात ट्रॅक्टरचा पोळा (Bail Pola) भरवला जातो. गावातील ७०-८० ट्रॅक्टर शाळा पटांगणात उभे केले जातात. सजविलेल्या ट्रॅक्टरच्या मालकांना बक्षिसे गावाच्या वतीने प्रदान केली जातात. 

तीन चार तास गावांत ट्रॅक्टरच्या पोळ्यांचा जल्लोष होतो. गावातून मिरवणूक काढली जाते. ट्रॅक्टरला रंगीबेरंगी फुलांनी, फुग्यांनी सजवले जाते. गावातील महिला वर्ग ट्रॅक्टरचे औक्षण करत असतात. कुशारी गावात साधारणतः ३०० बैल आहेत, बैलपोळ्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रथम दिवशी बैलपोळा त्याच दिमाखात भरवला जातो. ट्रॅक्टर पोळ्याची नवलाई बघण्यासाठी परिसरातील नागरिक येतात. 

सर्जा राजाची जागा ट्रॅक्टरने घेतली!

मागील काही वर्षात राज्यातील पशुधनाच्या घट झाल्याचे दिसून येते. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे अनेक कामांसाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो. यामुळे घराघरात दावणीला बांधलेले पशुधन दिसेनासे झाले आहे.. काही निवडक शेतकऱ्यांकडे गुरांचा राबता दिसून येतो. मात्र शेतीत बैलाचा वापर कमीच होऊन गेला आहे. ट्रॅक्टरच्या साह्यायाने शेतीतील अनेक कामे केली जात आहेत. म्हणून अनेक वर्ष शेतीत राबलेल्या जनावरांना विसरून कस चालेल. पशुधन वाढलं पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीगाय