- बाळासाहेब अस्वले
नाशिक : येत्या २ सप्टेंबर रोजी बैल पोळा (bail Pola) असून सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. ग्रामीण आणि शहरी भागात आजही हा दिवस तितक्याच आत्मियतेने साजरा केला जातो. या दिवशी बैलांचे पूजन केले जातेच, शिवाय घरोघरी मातीच्या बैलांचे देखील पूजन केले जाते. काळानुरूप मातीचे बैल बनविणे खर्चिक झाले असले तरीही या पारंपरिक सणासाठी माती कारागीर बैल बनविण्याची परंपरा टिकवून आहेत.
अवघ्या काही दिवसांवर बैल पोळा (Bail Pola) सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे माती काम करणाऱ्या कारागिरांकडून मातीचे बैल बनविण्यास सुरुवात झाली आहे. बैल पोळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील कुंभार बांधवांकडून मातीचे बैल बनवण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात आजही मातीचे बैल बनवण्याची परंपरा कायम असल्याचे दिसते. वर्षभर शेतात मेहनत करून घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची साथ देणाऱ्या सर्जा-राजाची सन्मानाने पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते.
कारागीर लागले कामाला
या श्रावण महिन्याच्या आमावस्येला येणाऱ्या सणासाठी सध्या कुंभार बांधवांकडून मातीचे बैल बनवण्यात येत आहेत. वैलांबरोबर घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करणे ही रूढी परंपरा अनेक वर्षांपासून आहे. गावागावातील कुंभारवाड्यांमध्ये मातीचे बैल बनवण्यासाठी स्पर्धाच निर्माण झाल्याचे दिसत आहे. मातीचे बैल तयार असून सध्या रंगरंगोटी देण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी कामाला वेग आला आहे. आधुनिक युगातही पीओपी किवा चिनी मातीचे बैल बाजारात विकण्यास येतात, ते नागरिक खरेदी करतात. पूजा झाल्यानंतर शोकेसमध्ये ठेवतात असे असले तरी माती बैल पूजेला महत्त्व दिले जाते.
मच्छिंद्र सोनवणे यांची जपली मातीची कला
मातीचे बैल तयार करण्यासाठी नाजूक कौशल्य दीर्घकाळ बैठकीचे आणि मेहनतीचे असणारे हे काम दिवसेंदिवस आर्थिक दृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे परंतु या कलेकडे पालखेड बंधारा येथील मच्छिंद्र सोनवणे यांनी समाजहित डोळ्यापुढे ठेवून ही कला व असणारा व्यवसाय आजतागायत जपला आहे.
याशिवाय आपले नातवंड ईश्वरी मोरे, अथर्व मोरे ही नवीन पिढी देखील आवडीने शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. बैल बनवण्यासाठी चिकन माती, घोड्याची लीद, राख व पाणी असे साहित्य लागते. पूजेसाठी चार बैल व एक घोडा असे ४० ते ५० रुपयात विक्री केल्यानंतर रोजगार उपलब्ध होतो असे त्यांनी सांगितले.