नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथील जैवविविधता संवर्धन करणाऱ्यांनी इराणच्या डॉ. हनी मोघांनी व लदाखच्या सोनम वांगचूक यांना सातपुड्यातील पारंपरिक बी-बियाणे (Natural Seed) भेट स्वरूपात पाठविले आहेत. यामुळे सातपुडयातील पारंपरिक बियाणे थेट इराण आणि लडाखला पोहचणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील (dhule district) साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे ३२ वा आदिवासी एकता महासंमेलनात जोहार फाउंडेशनने सातपुड्यातील पारंपरिक मूळ बीज प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी जैवविविधतेच्या समतोलाचे आश्वासन बीज प्रदर्शनाचे उदघाटन इराण येथील डॉ. हनी मोघांनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेजल गोरासिया, लक्ष्मण पावरा, मोगरा पावरा, डॉ. निकोलस उपस्थित होते.
स्थानिक मूळ बीजबद्दल सेजल गोरासिया यांनी डॉ. हनी मोघांनी यांना महत्त्व पटवून दिले. जोहार फाउंडेशनने संकलित केलेले सातपुड्यातील मूळ बीज इराण येथे पारंपरिक मोटीमध्ये सर्व बी-बियाणे एकत्र करून जैवविविधता संवर्धनासाठी भेट स्वरूपात दिले. डॉ. हनी मेघांनी यांनी पारंपरिक बीज स्वीकारून इराण देशात या पारंपरिक बी-बियाणांचा प्रसार व जतन संवर्धन करून जैवविविधता समतोल राखण्याचे आश्वासन दिले.
११९ बियाणांचे जतन
सातपुड्यातील नर्मदा नदी काठालगतच्या परिसरात मूळ बीज बी-बियाण्याचे संवर्धन आणि जतन जोहार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यांनी आजतागायत सुमारे ११९ प्रकारचे विविध पारंपरिक बी-बियाण्याचे जतन आणि संवर्धन केले आहे. सोनम वांगचूक यांनादेखील भेट म्हणून पाठविण्यात आले. लदाखसारख्या परदेशात ते पर्यावरण वाचविण्यासाठी लढत असतात. सातपुड्यातील मूळ बीज विविध क्षेत्रांतील प्रसार होऊन जैवविविधतेसाठी मदत होईल, असे लक्ष्मण पावरा यांनी सांगितले.