चंद्रपूर : विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगमध्ये वजन काट्यात (Variation In Weight) तफावत आढळल्याने शेतकऱ्यांनी कापूस खरेदी बंद पाडली. जिनिंगची सीसीआय मान्यता रद्द करण्यासह संबंधितांवर कठोर कारवाई करावी, आजपर्यंत विकण्यात आलेल्या कापसाची (Cotton Buying) शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम अदा करावी, यासह अन्य मागण्यांना घेऊन शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.
विद्युलवाडा परिसरात असलेल्या वृंदावन या सीसीआय खरेदी केंद्रात (Cotton Buying Center) सोमवारी एमएच ३४ एबी ३७७३ या वाहनामध्ये नीलकंठ गिरसावडे यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता, मात्र त्यांना कापसाच्या वजनामध्ये एक क्विंटल ६० किलोची तफावत आढळली. त्यानंतर भिमणी येथील शेतकरी आनंद पिंपळशेंडे यांनी एमएच ३४ एबी ७७४५ या वाहनाने कापूस आणला होता. त्यांनाही ५० किलो तफावत आढळली.
शंका आल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे वजन दुसऱ्यांदा करण्याची विनंती केली, मात्र मोठी तफावत आढळल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर संतप्त शेतकन्यांनी जिनिंगमध्ये कापसाची खरेदी बंद केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, पोलिसाच्या उपस्थितीत पुन्हा मोजणी करण्यात आली. मात्र तफावत आढळल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिनिंग मालकाला धारेवर धरले.
जिनिंग मालकावर कारवाईचे आश्वासन या जिनिंगमधील वजन काटा वैधमापन विभागाने जप्त केला. यावेळी त्यांनाही तफावत असल्याचे आढळून आले. दरम्यान, वजनमापे विभागाने जिनिंग मालकावर खटला दाखल केला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काटा इलेक्ट्रॉनिक असल्याने तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा काटा हँग झाला असावा. काट्यामध्ये कुठलेही सेटिंग किंवा तफावत नाही. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय केलेला नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. - सौरभ अप्रवाल, वृंदावन, जिनिंग मालक
वजन काट्यात ५५ किलो तफावत आढळल्याची घटना माझ्या समक्ष घडली. वैधमापन अधिकाऱ्यांनी पारदर्शक चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - इंद्रपाल धुडसे, सभापती, बाजार समिती गोंडपिपरी