Agriculture News : अलीकडच्या काळात भूजलाचा (Water Level) वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. भूजलाच्या शोधात प्रत्येक शेतकरी विहीरी दरवर्षी खोल करतांना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे विहिरीव्दारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. पर्यायाने भूजल पातळी खोलवर जात आहे.
वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर (Groundwater Level) राहणे गरजेचे आहे. भूजलसाठ्यात वाढ होण्यासाठी अति उपशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. याच बरोबरीने भूजल पातळी स्थिर राहण्याकरिता दुसरा उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण हा होय. जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. या थराची जाडी, आकारमान वेगवेगळे आहेत.
पहिला थर मातीचा, या थरातून पाणी मुरण्याचा वेग दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो. मुरमाच्या थरातून पाणी वाहनाचा हाच दर १० सें.मी. असू शकतो. ज्या खडकांना भेगा / फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात त्या खडकातून पाणी वहनाचा हाच दर २०० सें.मी. एवढासुध्दा असु शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासुन भूजल साठयापर्यंत पोहचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो.
म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे. हे दिसून येते. पाणी उपसण्याचा सध्याचा आपला वेग या वेगापेक्षा जास्त आहे. यावरुन विहीर पुनर्भरण हे किती महत्वाचे व गरजेचे आहे, ते दिसुन येते. भूजल पुनर्भरण वेगवेगळ्या उपयांनी करता येते. शेततळी (अस्तर नसलेली), पाझर तलाव, बंधारे, पुनर्भरण चर आणि विहीर पुनर्भरण हे त्यापैकी काही प्रमुख उपाय आहेत.
शेततळी पाझर तलाव, बंधारे तथा पुनर्भरण चर हे भूजल पुनर्भरणाचे उत्तम उपाय होत. पण या उपायाव्दारे पुनर्भरणाव्दारे भुजल साठा जास्त वेगाने वाढविला जातो. महाराष्ट्रातील विहिरींची संख्या लक्षात घेता व सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या हा उपाय राबविल्यास भूजल पातळीत स्थिरता आणता येईल.
- कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक