- अमोल अहिरे
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) युवा शेतकऱ्याने ड्रोन प्रशिक्षण घेत आता गाव परिसरात शेतकऱ्यांची फवारणी करून देत आहे. सद्यस्थितीत शेतीची फवारणीची कामे सुरु आहेत. यामुळे या युवा शेतकऱ्याला गाव परिसरात चांगला रोजगार मिळाला असून दिवसाला पाच हजार रुपयांची कमाई करत असल्याचे तरुणाने सांगितले.
मोहन चोरमले असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. ते मालेगाव तालुक्यात (Mohan Chormule) असलेल्या जळगाव निंबायती येथील रहिवासी आहेत. शेतकऱ्यांची वेळ, पैसा बचत व्हावा, शिवाय कष्टही कमी करण्याच्या उद्देशाने मोहनने ड्रोन फवारणी यंत्राच्या संचलनाचे हैदराबाद येथील संस्थेतून प्रशिक्षण घेतले. यानंतर गावाची वाट धरत येथील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानांची साथ देत ड्रोन द्वारे फवारणी (Insecticide spraying by drones) केली जात आहे. यातून त्याने दिवसाला सरासरी पाच हजार रुपये कमाई करत पंचक्रोशीतील युवा शेतकऱ्यांसाठी रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.
देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांजवळ कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात, काहींना विषबाधा होते व त्यातून काही शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने शेत फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देत, ड्रोन फवारणी यंत्राच्या वापरासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
वेळ, पाणी, औषधे व पैशाची होणार बचत
ड्रोन फवारणी यंत्राच्या साहाय्याने कमी पाण्यात, कमी औषधीत, विना श्रम तसेच अत्यल्प वेळेत व माफक खर्चात सदर फवारणी होत आहे. एकरभर फवारणीसाठी अवघ्या दहा लिटर पाण्याची गरज असते. यामुळे जास्तीचे पाणी आणि औषधीची देखील बचत होते. शिवाय दहा मिनिटांत एक एकर क्षेत्राची फवारणी होते. सदर फवारणीसाठी एकरी चारशे रुपये दर आकारला जातो. दिवसाला सरासरी दहा ते पंधरा एकर क्षेत्राची सहजपणे फवारणी केली जाते. त्यातून मोहनला दररोज पाच ते सहा हजार रुपयांची कमाई होत आहे.
ड्रोन यंत्रासाठी प्रशिक्षण व परवाना आवश्यक
ड्रोन हे रिमोट कंट्रोल आणि स्वायत्त उड्डाण करण्यास सक्षम असून जीपीएस आधारित नेव्हिगेशन सिस्टीम, सेन्सर्सची अॅरे आणि कंट्रोल मेकॅनिझमने सुसज्ज केलेले आहे. बॅटरीद्वारे ड्रोन संचलित केले जाते. विविध शेतीनिगडीत कामे करण्यासाठी ड्रोनला कॅमेरे आणि कीटकनाशक फवारणी यंत्र संलग्न केले जाते. ड्रोन ५० ते १०० मीटरच्या मर्यादेत कार्य करते. ५० मीटरपेक्षा जास्त उंचीसाठी शासनाच्या विशेष परवानग्या आवश्यक असतात. ड्रोनची ऑपरेशनल रेंज त्याचे आकारमान आणि क्षमतेवर ठरते.
तसेच दीर्घ उड्डाण कालावधीसाठी ओळखले जाणारे स्थिर-विंग ड्रोन, ५० मिनिटांच्या एका फ्लाइटमध्ये १२ किमी पर्यंतचे विस्तृत क्षेत्र व्यापू शकतात. हैदराबाद येथील तेलंगणा स्टेट एव्हिएशन ॲकॅडमी (TSAA) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंजूर केलेल्या हवाई प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. भारत सरकारच्या नियमांनुसार ड्रोन/आरपीए चालवण्यासाठी ड्रोन पायलट प्रमाणपत्र अनिवार्य आहे. प्रमाणपत्राशिवाय ड्रोन चालवणे हा कायद्यानुसार दंडनीय गंभीर गुन्हा आहे.
‘कृषी ड्रोन अनुदान योजना’
शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा अधिकाधिक वापर करता यावा, कृषी क्षेत्रात ड्रोन फवारणी यंत्राच्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने शासनातर्फे कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सरकार कृषी पदवीधारक शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी ५० टक्के किंवा ५ लाखापर्यंतचे अनुदान देते. तसेच इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ४ लाखापर्यंतचे अनुदान मिळते.