जळगाव : जळगाव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात केळीसाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आता केळी व कापसासह इतर फळ पिकांकडे वळत आहेत. कापूस या नगदी पिकासह आता जळगाव जिल्ह्यात फळपिकांचे क्षेत्र वाहू लागले असून, जळगाव जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर १६ प्रकारच्या वेगवेगळ्या फळांची लागवड केली जात आहे. केवळ फळबागांचीशेतीच नाही, तर विदेशातही फळांची निर्यात जिल्ह्यातील शेतकरी करू लागले आहेत.
सर्वाधिक क्षेत्र केळीचे...
फळबागांचे एकूण क्षेत्र ६५ हजार ८९९ इतके असून, त्यात सर्वाधिक ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. केळीसाठी जिल्हा अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. आता शेतकरी फळपिकांना आंतरपीक म्हणून घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच हंगामात दुहेरी उत्पन्न मिळत आहे. यात जळगाव जिल्ह्यात 3653 हेक्टर, भुसावळ तालुक्यात 1 हजार 96 हेक्टर तर यावल तालुक्यात दहा हजार 993 हेक्टर, रावेर तालुक्यात 22 हजार 478 हेक्टर, चोपडा तालुक्यात 4 हजार 881 हेक्टर चाळीसगाव तालुक्यात 1766 हेक्टरवर फळबागा लागवड करण्यात येणार आहे.
पेरू उत्पादक शेतकरी विजय पाटील म्हणाले की, केळीची लागवड तर केलीच जाते, मात्र त्यासोबत आता इतर फळांचीही लागवड आम्ही करत आहेत. मी पपई व पेरूची लागवड माझ्या शेतात केली आहे. पेरूची लागवड करून त्यात अन्य पिकांचीही शेती करत आहे. यामुळे मला दुहेरी उत्पन्न मिळत आहे. तर टरबूज उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, शेतकरी आता बाजारपेठेची स्थिती पाहून आपल्या शेतीत बदल करायला लागला आहे. केवळ पारंपरिक पिके न घेता जमिनीची क्षमता ओळखून शेतकरी शेती करत आहेत. फळपिकांसाठी शासनाकडून चांगले अनुदान मिळते व बाजारात नेहमी मागणीदेखील असते.
केळीची विदेशातही निर्यात
जळगाव जिल्ह्यातील केळीची विदेशातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आखाती देशांमध्ये जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल निर्यात करू लागले आहेत. यासह मोसंबी व टरबूज या फळपिकांचीही विदेशात निर्यात केली जात आहे. मोसंबी व लिंबू या फळपिकांचे क्षेत्रदेखील वाढत आहे. पेरू व पपई या फळांचे क्षेत्र वाढत असून, शेतकरी आपल्या शेतीत आता अनेक बदल करत आहेत.