चंद्रकांत गायकवाड
तिसगाव : श्री क्षेत्र वृद्धेश्वर-मायंबाच्या गर्भगिरी डोंगर रांगांकडे आयुर्वेदात महती असलेल्या विविध वनौषधींचे आगर म्हणून पाहिले जाते. घाटशिरस (ता. पाथर्डी) येथील काही महिलांनी याच नैसर्गिक उपलब्धीचा सुयोग्य वापर करीत सेंद्रिय शेतीचा वसा घेतला आहे.
घरगुती स्वरूपातील या उद्योगाला वॉटर शेड प्रकल्पाची नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे अनेक महिलांचा समूह तयार होऊन या चळवळीला आता बचत गटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डोंगर दऱ्यांत पायी फिरून या महिला घाणेरी, करंज, कडूलिंब, लाल कन्हेरी निरगुडी, एरंडी, रुई, पपई, सीताफळ, गुळवेल या झाडांचा पाला गोळा करतात.
देशी गायीचे गोमुत्र, शेण व विविध वनौषधींच्या पाल्याचा वापर करून दशपर्णी, निंबोळी अर्क, जीवामृत, अमृत पाणी स्लरीची निर्मिती करतात. वीस ते तीस रुपये लिटरने मिळणारे हे औषध शेती अन् शेतकऱ्यांच्या आरोग्य पत्रिकेला बळकटी देत आहे.
ह्याच्या वापराने कोणताही दुष्परिणाम नसल्याने मागणीही वाढत आहे. मीना चितळे, अश्विनी पालवे, अंजना पालवे, अनिता पालवे, शुभांगी शिंदे, सीमा पाठक आदींनी निर्मितीसह विक्री तंत्राची माहिती दिली.
सरपंच गणेश पालवे म्हणाले, वाढत्या रासायनिक खतांच्या वापराने शेती अन् शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे. कीड, रोगांचे अस्मानी संकट आहे. बाजारात मिळणाऱ्या औषधींच्या मात्रा प्रतवारी दर्जाहीन आहेत. परिपूर्ण तंत्रज्ञानयुक्त जैविक शेती हाच उपाय शेष आहे.
वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर व अॅक्सिस बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून घाटशिरस गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले आहे. जैविक शेतीसाठी प्रोत्साहन देणे. महिला बचत गटांची निर्मिती करून जनजागृती केली जात आहे. - पृथ्वीराज गायकवाड, कृषी अधिकारी, पुणे