नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कॅनडा स्थित कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया - कोल–सेमका कार्यालय नवी दिल्ली व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित - एम.के.सी.एल. (MKCL - Maharashtra Knowledge Corporation Limited) यांच्यात ‘शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता - ए.आय. (AI - Artificial Intelligence) आधारित साक्षरता व जागृती’ या मराठी भाषेतील शिक्षणक्रम संदर्भात त्रिपक्षीय सामंजस्य करार - एम.ओ.यु. (MoU - Memorandum of Understanding) करण्यात आला.
यावेळी बोलताना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की बदलता काळ व बदलते तंत्रज्ञान बघता कृत्रिम बुद्धिमता - ए.आय. (AI) ही केवळ एका ठराविक क्षेत्राची किंवा एकाच वर्गापुरता सीमित राहिलेली नाही. विद्यापीठाने या आधी शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता - ए.आय. (AI) वापर सुरु केलेला आहे. आता या करारामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची व विकासाची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रारंभी दहा हजार शेतकऱ्यांचे उद्दिष्ट् निश्चित केलेले आहे. मराठी भाषेसह इतर आठ प्रादेशिक भाषा व आठ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये हा शिक्षणक्रम उपलब्ध केला जाणार आहे. विशेष म्हणजे येत्या नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू सोनवणे यांनी सांगितले.
कोल-सेमकाचे (COL-CEMCA) चे भारतातील नवी दिल्ली कार्यालयातील संचालक डॉ. बशीरहमाद शड्रच म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता - ए.आय. (AI) ही आता कुणा एकाची मक्तेदारी राहिलेली नाही. कॉल-सेमकाने (COL-CEMCA) विकसित केलेल्या या शिक्षणक्रमास ब्राजील, केनिया, सर्बिया, नायझेरिया आदी विविध देशातून मागणी आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या माध्यमातून मूल्यमापन व प्रमाणित करण्याचे काम करण्यात येईल. त्यासाठी एम.के.सी.एल. (MKCL) चे तांत्रिक सहकार्य लाभेल. तसे पाहता सदर शिक्षणक्रम हा ऑनलाईन असल्यामुळे त्यास देश – प्रदेशाची मर्यादा नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठास जागतिक परीघ प्राप्त होवू शकतो, अशी आशा डॉ. शड्रच यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी व्यक्त केली.
बांधावर बसून छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स...
एम.के.सी.एल. (MKCL) चे महाव्यवस्थापक अमित रानडे म्हणाले की, शेतकऱ्यांकडे असणाऱ्या स्मार्ट मोबाईलच्या सहाय्याने शेतकरी वर्गास या शिक्षणक्रमाचा लाभ घेता येईल. आपल्या बांधावर बसून तो छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स च्या माध्यमातून शेतीविषयी नवीन तंत्रज्ञान, माहिती प्राप्त करू शकेल. या शिक्षणक्रमात शेतकऱ्यांचा अभिप्राय, त्यांचे अनुभव व शेतीवर आधारित स्वत:चे व्हिडिओज देखील ते अपलोड करू शकतील. उपयोग आणि सहभाग या तत्वावर हा शिक्षणक्रम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे रानडे यांनी शेवटी सांगितले.
सकारात्मक बदलाचे संकेत
भारतातील इस्राईली दूतावासातील ए.आय. (AI) शिक्षणतज्ञ श्रीमती माया शर्मन म्हणाल्या की महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या शिक्षण – प्रशिक्षणसाठी आयोजित हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बघण्यास मी उत्सुक आहे. भारतात नवनवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या वेगाने प्रसारच नाही तर स्वीकार होत आहे. तळागाळातील लोकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणे व करू दिला जाणे हे निश्चितच सकारात्मक बदलाचे संकेत आहेत. त्या दृष्टीने पाहता हा शिक्षणक्रम तयार केला जाणे ही कृतीच नव्हे तर त्यामागील विचार व भावना माझ्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे भावनिक उद्गार श्रीमती माया शर्मन यांनी काढले.