नाशिक : 'विद्यापाठीशी संबंधीत शेतकऱ्यांनी (Farmers) जे जे काही चांगले संशोधन अथवा चांगले काम केलेले असेल त्याचे स्वामित्व मिळविण्यासाठी विद्यापीठ काम करणार आहे. तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने एआयच्या बाबतीत साक्षर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीमध्ये आपले सर्वांचे योगदान असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.
आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 35 वा वर्धापनदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले की, विद्यापीठ येणाऱ्या काळात राबविणार असलेल्या विविध उपक्रम तसेच अभ्यासक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. समाजाची गरजपूर्ण करण्याचे अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच महास्वयंममार्फत महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात काम करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र असलेले आर. आर. लाहोटी महाविद्यालयातील केंद्र संयोजक श्रीमती सरिता खोबरे यांच्या स्वलिखित ‘मुक्त ज्ञान सरिता’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. प्रमुख पाहूण्यांची ओळख डॉ. पुनम वाघ यांनी करून दिली, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले. कार्यक्रमास संचालक डॉ. जयदिप निकम, डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. कविता साळुंके, डॉ. राम ठाकर, डॉ. संजिवनी महाले, माधव पळशीकर, डॉ. माधूरी सोनवणे, नागार्जुन वाडेकर, डॉ. चेतना कामळस्कर, डॉ. सुरेंद्र पाटोळे, डॉ नितीन ठोके, डॉ मधुकर शेवाळे, विद्यापीठातील विविध विद्याशाखेचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक उपस्थित होते...
सृजनशील संवादाचा दिवस
याप्रसंगी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात जेष्ठ समिक्षक आणि विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. रमेश वरखेडे यांचे ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ काल, आज व उद्या’ या विषयावरील व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. आपले विचार व्यक्त करतांना डॉ. रमेश वरखेडे यांनी सांगितले की, वर्धापनदिन हा दिवस विद्यापीठाच्या पुर्व परंपरेचा, नव्या संकल्पनांचा, ध्येय उद्दिष्टांचा जागर करण्याचा तसेच सृजनशील संवादाचा दिवस आहे. या दिवसाला एक सांस्कृतिक मुल्य आहे असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाची काळानुरूप गुणवत्ता वाढीसाठी काय काय करायला पाहिजे, तसेच नविन प्रवाहानुसार काही नवनविन उपक्रम राबविण्यात यावे याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.