Agriculture News : शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. विभागाने कृषी सहायकांना लॅपटॉप (Krushi Sahhayak) देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील, असा प्रयत्न आहे, असेही कृषी मंत्री म्हणाले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या (State Agri Workshop) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कृषी हॅकेथॉन आयोजित करून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात येणार आहे. केवळ कृषी विद्यापीठांवर (Agriculture University) अवलंबून न राहता शेतीमध्ये, उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले, तंत्रज्ञान विकसित केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नवकल्पना घेणे, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे हा यामागील उद्देश आहे.
अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी प्रयोगशील असल्यामुळे, तंत्रज्ञानाची ओढ असल्याने, नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतामध्ये बदल करणारे आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रत्यक्ष सुरू केले आहे. परंतु, या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मागे आश्वासकपणे उभे राहण्याचे काम शासनाला करायचे आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
तर सूरज मांढरे म्हणाले, या कार्यशाळेत शेतकऱ्यातील शेतकरी, विक्रेता, खरेदीदार आदी पैलूंवर चर्चा करण्यायसह कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नावर विचारमंथन करून उपाययोजना सादर करणे आणि दिशा ठरविण्यात येणार आहे. आज देशाचे कृषी उत्पादन वाढले मात्र, ग्राहक अन्नाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे. व्यक्तिगत शेतकऱ्याची खरेदी क्षमता विखुरल्यामुळे खर्च वाढलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे येत आहे. आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.