Join us

Agriculture News : पीक विमा तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक बिझी, कृषी सहाय्यकाकडे अर्ज करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:56 PM

Agriculture News : ज्या शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक बिझी असल्याने नोंदणी करता आली नव्हती, अशा शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे अर्ज करावेत..

नंदुरबार : जिल्ह्यात पीक विमा करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या (Crop Insurance Company) टोल फ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक बिझी असल्याने नोंदणी करता आली नव्हती, अशा शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे अर्ज दिल्यानंतर तातडीने त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी नंदुरबारात भेटीदरम्यान दिले आहेत. 

नाशिक उत्तर महाराष्ट्रातील (Nashik District) जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. तर गत १५ दिवसात वेळोवेळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी शेतकरी सातत्याने विमा कंपनीच्या (Pik Vima) टोल फ्री क्रमांकावर संपर्क करत होते. परंतु हा क्रमांक बिझी येत असल्याने ७२ तास उलटूनही तक्रार नोंदविता आली नव्हती, परिणामी बहुतांश शेतकरी विमा घेऊनही भरपाईला मुकण्याची चिन्हे होते. यामुळे शेतकरी वेळेत पंचनामे करण्यासाठी आग्रही होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून कृषी विभागाच्या कृषी सहायकाकडे शेतकऱ्याने अर्ज देण्याचे आदेश दिले गेले आहेत.

१ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे विमा 

नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख १३ हजार ४४० शेतकऱ्यांनी १ रुपयात पीक विमा घेतला होता. यातून १ लाख १७ हजार २४९ हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षित झाले होते. या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, कीडरोग यासह इतर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास विमा भरपाई मिळणार आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन माहिती देत होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना हा क्रमांक बिझी असल्याने आपल्या तक्रारी नोंदविता आल्या नाहीत. त्यामुळे कृषी सहाय्यकाकडे अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद टोल फ्री क्रमांकावर झाली नसेल अशा शेतकऱ्यांनी एक अर्ज कृषी सहायकाकडे द्यावा. कृषी विभाग नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देणार आहे. यानंतर तातडीने पंचनामे होतील. - सी. के. ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार.

विमा कंपनीचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी येत आहेत. एका दिवसाला ५० शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. मात्र, गत आठवड्यात जो मुसळधार पाऊस झाला त्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे पूर्ण करणे आवश्यक आहे. - हरी दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा

Crop Damage : डोळ्यांदेखत सगळंच वाहून गेलंय, कशाचा पंचनामा करणारं, शेतकऱ्यांचा सवाल

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनंदुरबारपीक विमा