अमरावती : फळपिकांच्या आंबिया बहराचा 10.71 कोटींचा परतावा पीक विमा कंपनीने मंजूर केला, परंतु देण्यास टाळाटाळ केली होती. याबाबत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांचा दवाब व कृषी विभागात सातत्याने होत असलेली आंदोलने, यामुळे अखेर कंपनीला नमते घ्यावे लागले. दोन दिवसांत मंजूर परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
सन 2022-23 मधे संत्रा आंबिया बहार हवामान आधारित फळपीक विमा योजनेकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यरत होती. योजनेअंतर्गत 10.71 कोटी फळपीक विमा मंजूर झाल्याचे कंपनीने जुलै व ऑगस्ट 2013 मध्ये कळविले होते. परंतु कंपनीने त्यानंतर हवामान केंद्राच्या आकडेवारीवर आक्षेप घेऊन सदर मंजूर विमा रक्कम थांबविली होती. याबाबत पाठपुरावा झाल्यानंतर कंपनीद्वारे फक्त 4.25 कोटी रकमेचा परतावा शेतकऱ्यांना दिला होता व मोठ्या प्रमाणावर रक्कम प्रलंबित ठेवली होती. आता कंपनीद्वारा ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण मंजूर झालेला निधी वितरित केला आहे, तालुकास्तरावरील कार्यालयेसुद्धा सुरु केले आहे.
असा मिळाला परतावा
संत्रासाठी 3303 शेतकरी व शासन हिस्सा 13.75 कोटी कंपनीकडे जमा करण्यात आला होता. त्या तुलनेत 2998 उत्पादकांना 10.15 कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे. केळीसाठी 140 शेतकऱ्यांना 63.39 लाख रुपये व मोसंबीसाठी 81 उत्पादकांना 4.14 लाखांचा परतावा मंजूर करण्यात आला व जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शिवाय पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांनीही पाठपुरावा केला, काही राजकीय पक्ष व संघटनांद्वारा आंदोलने करण्यात आली. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम झाल्याने पीक विमा कंपनीद्वारा शेतकऱ्यांना परतावा देण्यात आलेला आहे..
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी