Lasalgaon Kanda Market : सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैल पोळा (Bail Pola). उद्या मोठ्या उत्साहात हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होईल. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट बंद असणार आहे. कांदा लिलावासह इतर शेतमालाचे लिलाव देखील बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यामध्येच लिलाव पार पडणार असल्याचे चित्र आहे.
श्रावण महिना (Shravan Mahina) हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा. राज्यातील शेतकरी गाडगी वाजत गाजत हा सण साजरा करतात. म्हणूनच नाशिक जिल्ह्यातील महत्वाची कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव मार्केट कमिटीने उद्या लिलाव बंद ठेवले आहेत. हा एकच दिवस बैलांना विश्रांतीसाठी देत असतो. त्यानंतर वर्षभर शेतात राबत असतो. त्यामुळे उद्या लासलगाव कांदा मार्केट बंद असणार आहेत.
याबाबत लासलगाव बाजार समिती प्रशासनाने सूचना काढली असून त्यानुसार सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, सोमवार, दि. 02 सप्टेंबर रोजी अमावस्या (पोळा) सण असल्याने लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. तसेच मंगळवार, दि. 03 सप्टें ते शुक्रवार, दि. 06 सप्टें या कालावधीत जैन पर्युषण पर्व असल्याने कांदा या शेतीमालाचे लिलाव सकाळी 10.00 वा. सुरू होतील. त्याचप्रमाणे सोमवार, दि. 02 सप्टें रोजी टोमॅटो व भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव नेहमीप्रमाणेच सुरू राहतील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
आजचे कांदा बाजारभाव
आज उन्हाळ कांद्याची (Summer onion) अहमदनगर जिल्ह्यात 3658 क्विंटल तर नागपूर जिल्ह्यात 30 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला अनुक्रमे अहमदनगरला 3605 रुपये, तर नागपुरात 3500 रुपये दर मिळाला. जळगाव जिल्ह्यात लाल कांद्याला 3300 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3400 रुपये, लोकल कांद्याला 2938 रुपये, चिंचवड कांद्याला 3850 रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला.