Join us

व्यापाऱ्यांकडून फसवणूक? बळीराजा हेल्पलाईन देतेय शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:30 PM

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्याच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईन नावाची हेल्पलाईन सुरु कारण्यात आली होती. शेतकऱ्यांनी देखील आपल्या तक्रारी ...

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्याच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईन नावाची हेल्पलाईन सुरु कारण्यात आली होती. शेतकऱ्यांनी देखील आपल्या तक्रारी पोलिसांसमोर हेल्पलाईनच्या माध्यमातून मांडल्या होत्या. पोलिसांनी देखील या मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले असून जवळपास  157 तक्रारींचा निपटारा पोलिसांनी केला. तर साधारण 69 शेतकऱ्यांना 55 लाख 71 हजार 119 रुपये फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.

नाशिक जिल्ह्यास भाजीपाल्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळांचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. मात्र मागील काही वर्षांत व्यापाऱ्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे शेतकरी वारंवार पोलिसांकडे याबाबत तक्रारी करत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बळीराजा हेल्पलाईन सुरु करण्यात आली होती. आजपर्यत सदर हेल्पलाईनवर एकूण 157 शेतक-यांनी आपली ग-हाणी मांडली. यातील 69 शेतक-यांना रुपये 55 लाख 71 हजार 199 रुपये एवढी फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मोलाची भूमिका बजावली.

बळीराजा हेल्पलाईन  नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो व भाजीपाला प्रसिद्ध असल्याने बाहेरील व्यापा-यांनी शेतक-यांचा माल खरेदी करून त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी पोलीस मुख्यालयाकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडे थेट तक्रार करता यावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय शेतजमीन मोजणी, विविध प्रकारचे ना हरकत दाखले अशा विविध कामांसाठी शेतकरी संपर्क साधतात. थेट संपर्क करून कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही हेल्पलाइन महत्त्वाची ठरत असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले. 

हेल्पलाइनवर साधा संपर्क  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित कामांसाठी पोलीस ठाण्यात किंवा इतर कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी पोलिस ठाण्यात व इतर कार्यालयांमध्ये जावे लागते. बऱ्याचदा आपले काम कुणाकडे प्रलंबित आहे, याची माहितीदेखील त्यांना मिळत नसल्याने त्यांना अकारण प्रवास सोसावा लागतो. त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात असल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांसाठी आता 6262 (76) 6363 ही नवीन बळिराजा हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :नाशिकशेतीशेतकरीद्राक्षे