- विकास खोब्रागडे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ताडोबा झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रामधील पिपर्डा व पळसगाव ही गावे ताडोबा जंगलालगत लागून आहेत. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने उन्हाळ्यात लोकांना जीवन जगण्यासाठी कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. जंगली प्राण्यांची भीती असतानासुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जीव धोक्यात टाकून गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक जंगलात जाऊन बांबूबिया (कटंग) गोळा करून कसाबसा रोजगार मिळवत आहेत.
काही दिवसापूर्वीच वनविभागाच्या वतीने बांबू बिया गोळा करण्याचे काम गावातील मजुरांना दिले असता उन्हाळ्यात त्यांना कसाबसा रोजगार मिळाला आहे. त्यामुळे कुटुंबांना जगण्याचा काही प्रमाणात आधार मिळाला आहे. पळसगाव परिसरात लोक शेतीशी संबंधित कामे करतात. मात्र, उन्हाळ्यात रोजगाराचे कुठलेच साधन उपलब्ध नाही. यावेळी कित्येक वर्षांनंतर बांबूची झाडे नष्ट झाली आहेत. सुकून गेली आहेत. सुकून गेलेल्या बांबूच्या झाडाच्या खाली बिया असतात. त्या गोळा करण्याचे काम जंगल भागातील लोक करीत आहेत. पहाटे जंगलात जाऊन बिया गोळा केल्यावर त्या स्वच्छ करून गावातील व्यक्तीला विकल्या जात आहेत.
१५० रुपये प्रति किलो
एका बांबूच्या झाडापासून शंभर ते दोनशे ग्रॅम तर कधी एक किलो बांबू बिया मिळतात. सुकलेल्या बिया घरी आणून स्वच्छ करून विकल्या जात असून १५० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत. मात्र सरकारी दर २०० रुपयांपेक्षा जास्त आहे. गरीब मजुरांकडून कमी भावाने खरेदी करून व्यापारी लोक चढ्या भावाने वनविभागाला विकत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना यातून कमी मजुरी मिळत आहे.
बांबू बिया (कटंग) गोळा करून १२ ते १३ हजार रुपये महिन्याला मिळतात. त्यामुळे कुटुंबाला मोठा आधार होतो. मात्र वन्यप्राण्यांमुळे जंगलात जाणे खूप जोखमीचे काम आहे. परंतु कुटुंब जगण्यासाठी ही रिस्क घ्यावीच लागते.
- किशोर भिमटे, मजूर पळसगाय.