जळगाव : सध्या केळीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील जामडी येथील प्रयोगशील शेतकरी दीपक राजपूत यांनी निर्यातक्षम केळी (Banana Crop) पिकवली आहेत. या केळीला थेट रशियातून मागणी झाली असून ही केळी रशियाकडे रवाना झाली आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यातील बाजार समित्यांमध्ये केळीला मिळणारा बाजारभाव (Banana Market) दुसरीकडे निर्यातक्षम केळीला मिळणारी किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.
शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो, मेहनत करतो आणि अन्नधान्य फळे भाजीपाला मेहनतीने पिकवतो. पण त्याला जर योग्य भाव मिळाला नाही, तर तो माल कितीही उच्च प्रतीचा असला तरी शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागते. मात्र त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि त्याला चांगला भाव मिळाला. दीपक राजपूत यांनी मागीलवर्षी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये तीन हजार केळीचे रोप लावले.
या केळीची निगा ठेवली, मशागतही चांगली केली. संपूर्ण परिवार शेतामध्ये राबला. केळीला साधारण २२ ते २५ किलो वजन भरेल, असे केळीचे घड लागले. शिवाय केळीची प्रतवारी चांगली असल्यामुळे केळी व्यापाऱ्यांमधून केळीला चांगली मागणी होऊ लागली. निर्यातक्षम दर्जाची केळी असल्यामुळे दीपक राजपूत यांच्या केळीला २१०० रुपये इतका भाव मिळाला. व्यापाऱ्यांनी ती कटाईला सुरुवात केली आहे. जवळपास ४० दिवस टिकू शकेल, अशी ही केळी आहे. ही केळी रशियाला रवाना झाली आहे. राजपूत यांचे लहान भाऊ, आई वडील, पत्नी, भावजय असा सर्व परिवार शेतात राबवून नियमित वेगवेगळे उत्पन्न घेतो.
केळीची निर्यात वाढण्याची शक्यता
हळूहळू केळीची निर्यात वाढत असून आता रशियाने देखील केळी आयातीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. केळी ही रशियाची एक प्रमुख कृषी आयात असून रशियात प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर येथून केळी आयात केली जात होती. भारतीय केळीच्या प्रमुख निर्यात स्थळांमध्ये इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, ओमान, उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, नेपाळ, कतार, कुवेत, बहारीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे.