रब्बी हंगामांतील महत्वाचे पीक असलेला हरभरा सध्या काही भागात जोमात असून अनेक बाजारात हरभऱ्याची भाजी आली आहे. हिवाळ्यात थंडीची चाहूल वाढली असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याच्या भाजीकडे वळल्याचे चित्र आहे. हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खुडून आता विक्रीस आली आहे. त्यामुळे भरपूर लोहसत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेली हरभऱ्याची भाजी सध्या चांगलाच भाव खात आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी गाठली असली तरी त्याचे प्रमाण थोडेफार कमी - जास्त राहिले. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची 70 टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे. हरभरा पिकाची सुमारे 90 टक्के हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. बाजारात हरभऱ्याची भाजी विक्रीस आली आहे. त्याचा दर 20 रुपये भाजीचा वाटा आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी लज्जतदार लागते. शहरातील उपनगरांमध्ये ग्रामीण भागातून येणारे काही शेतकरी जुड्या बांधून घरासमोर येऊन हरभरा भाजी विकत आहेत. यामध्ये खुडलेल्या हरभरा भाजीचे सहसा वीस वीस रुपयांचे वाटे घातले जातात. त्यानुसार नागरिक खरेदी करत असतात.
आरोग्यासाठी फायदेशीर
हरभऱ्याची कोवळी पाने खुडून त्याची भाजी बनवतात. या भाजीमध्ये कोलेस्टेरॉल नसते. हे हार्टच्या आजारात बचाव करते. यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते. हरभरा वनस्पतींचे सर्व भाग उपयुक्त असून, बियांत प्रथिने व कार्बोहायड्रेट्स तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ यांचा भरपूर उपयोग करतात. हरभऱ्याच्या भाजीत भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हरभरा भाजीमध्ये असलेला कार्बोहायड्रेट शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते. तसेच भाजीतील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते. त्यामुळे हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
भुसावळमध्ये आवकच नाही..
रब्बी हंगामाच्या सुरुवातीस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हरभरा पिकासही मोठा फटका बसला. त्यामुळे भाजी बाजारात हरभऱ्याची भाजी अद्याप आलेली नाही. त्यामुळे आवडीने भाकरीसोबत खाण्यात येणारी हरभऱ्याची भाजी ताटातून गायब झाली आहे. यंदा आधीच भुसावळ तालुक्यात हरभऱ्याचा पेरा निम्म्याने घटला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळ्यातील भाजीपाल्याची मोठी आवक सध्या आहे. त्यामुळे भाजीपाला स्वस्त आहे. मात्र यंदा हरभऱ्याची भाजी अद्याप बाजारात विक्रीला आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.