खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीकामांची लगबग सुरु आहे. येत्या काही दिवसांत पेरणीला देखील सुरवात होणार आहे. तत्पूर्वी शेतकरी विविध विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करत असतात. मात्र अनेकदा बोगस बियाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. आता खरीप हंगामातील कांद्याची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे कांद्याची शेती करताना कांदा बियाणे घेणाऱ्यांकडे उत्कृष्ट कांदा बियाणे असणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु नेमके इथेच बहुतांश शेतकऱ्यांची फसवणूक होते. बोगस बियाण्यांमुळे कांद्याचा संपूर्ण हंगाम तर वाया जातोच, परंतु शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानही होते. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात बोगस बियाणे विक्रेते फसवणूक करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत,.
म्हणूनच खरिपाच्या पार्श्वभूमीवर अनेक विक्रेते अशा प्रकारे फसवणूक करू शकतात. अनेक बोगस कांदा बियाणे विक्रेते आपले नाव, मोबाईल नंबर, फोटो बदलून जुने व बोगस बियाणे सर्रासपणे विक्री करू शकतात. शिवाय विक्री करत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आताही कांदा बियाणे घेताना सावधगिरी बाळगावी. आपली आणि आपल्या आजूबाजूंच्या शेतकऱ्यांची कांदा बियाणेमध्ये फसवणूक होणार नाही याची सर्वांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कांदा उत्पादकांनी शक्यतो घरचेचे कांदा बियाणे वापरावे परंतु घरचे बियाणे नसल्यास सर्वात आधी कृषी विद्यापीठाचे प्रमाणित तसेच आपल्या नियमित अनुभवातील कंपन्यांचे तसेच वर्षानुवर्षे विश्वासातील कांदा बियाणे विक्रेत्यांचे बियाणे खरेदी करावे. आपापल्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या बियाणे खरेदी केल्यास फसवणुकीच्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.