Seed Bank : रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरुणाच्या पोटात गोळा उठतो. पण गोंदिया (gondiya) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्ष लागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' हा संत तुकारामांचा अभंग ऐकताना सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार होतो. इतके सामर्थ्य या अभंगात आहे. तुकारामांचा काळ हा निसर्गाच्या सानिध्यात भरपूर वनश्रीने नटलेला ४०० वर्षांपूर्वीचा काळ होता. तरीही संत निसर्गाप्रति आपला कृतज्ञभाव व्यक्त करतात. निसर्ग व पर्यावरणाविषयी कुणीही संवेदनशील नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी निसर्गाचा हास होताना आपण बघत आहोत. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून वृक्ष लागवडीचा (tree Plantation) ध्यास घेणे काळाची गरज आहे.
रविवार सुटीचा दिवस कुठेही मित्रांसोबत रमायचे नाही व टीव्हीसुद्धा बघायचा नाही. फक्त घराच्या माडीवर जाऊन काम करायचे हा त्याचा ध्यास. आपण कोणतीही फळं खाल्ल्यानंतर निरूपयोगी समजून त्याचे बीज फेकतो. ते निरर्थक वाया जाते. मात्र भार्गवने प्रत्येक ऋतूत होणाऱ्या फळांच्या बिया गोळा करून ठेवल्या, शेजाऱ्यांना गोळा करून ठेवण्यास सांगितले आणि बिया जिथे दिसतील तिथून आणल्या. उन्हाळ्यात हे बीज वाळत घातले. पावसाळ्यात बीज पेरले की ते जगते म्हणून त्याने सीडबॉल (seed bank) पद्धतीचा अवलंब केला.
सीडबॉलच्या माध्यमातून रोपणसीडबॉल म्हणजे मातीचे गोळे होय. माती, शेणखत व गोमूत्राच्या मिश्रणात दोन-तीन बिया टाकून सीडबॉल तयार केले जातात. या बॉलमध्ये पोषक मूल्ये असल्यामुळे जमिनीत रुजेपर्यंत ती तग धरू शकतात. या पध्दतीने भार्गवने सुमारे एक हजार सीडबॉल तयार केले. गोळा केलेल्या बिया व सीडबॉल हे सुरक्षित ठिकाणी नेऊन फेकायचे हा त्याचा दृष्टिकोन आहे. त्याने या वर्षात पपई, सीताफळ, बोर, जांभूळ, चिकू, आंबा, मोह (टोरी) या स्थानिक झाडांच्या प्रजातीच्या बियांचा वापर केला.
सुटीच्या दिवशी राबवला उपक्रमओसाड जमीन, टेकडी, गाव किवा शहराच्या मोकळ्या परिसरात सीडबॉल नुसते फेकले तरी त्यातून रोपटे निघते. हा उपक्रम सुटीच्या दिवशी करायचा, असा निर्धार त्याने केला. तयार केलेले सीडबॉल हे मागणी करणाऱ्या इच्छुक व्यक्तीला तो मोफत देतो. अनेकांनी हे सीडबॉल त्याच्याकडून नेले आहेत. वर्षभरात गोळा केलेल्या बिया व सीडबॉल त्याने रामघाटच्या जंगलात नेऊन टाकले. सुमारे हजार बिया व सीडबॉल टाकले. यापैकी निदान शंभर झाडे जरी तयार होऊन जगली तरी आपण केलेल्या परिश्रमाचे फलित होईल, असा आशावाद त्याने व्यक्त केला.