Join us

Biogas Plant : शिळ्या अन्नापासून होतेय बायोगॅस निर्मिती, पंगतीनंतर उर्वरित अन्नाचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 5:45 PM

Biogas Generation: जेवणावळीनंतरच्या शिल्लक अन्नाची विल्हेवाट आता बायोगॅसच्या माध्यमातून लावली जात आहे. 

चंद्रपूर : जिल्ह्यातील (Chandrapur) गोंडपिपरी येथील कन्यकामाता मंदिरात भोजनदान दिले जाते. मात्र अनेकदा तयार केलेले अन्न शिल्लक राहते. यावर उपाय म्हणून येथील मंदिर समितीने मंदिर सभागृहाच्या बाजूलाच बायोगॅस प्रकल्प (Biogas Project) तयार केला आहे. आता याच बायोगॅसच्या माध्यमातून भोजन तयार केले जाते. शिवाय सभागृहात राहणाऱ्या इतरही कर्मचाऱ्यांना याचा लाभ होऊ लागला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील कन्यकामाता मंदिर सभागृहात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होत असते. मंदिर सभागृह परिसरात मोकळी जागा असल्यामुळे जनावरांचा वावर दिसून येत असतो. दरम्यान, कार्यक्रमातील अनावश्यक आणि नाशवंत अन्न बाहेर फेकल्यांनतर मोकाट गुरांनी ते खाल्ले तर त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून मंदिर प्रशासनाने शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. या सभागृहात अनेक कार्यक्रम पार पडतात; मात्र हे कार्यक्रम संपन्न झाल्यावर जेवणावळीनंतर शिल्लक अन्नाची विल्हेवाट आता बायोगॅसच्या माध्यमातून लावली जात आहे. 

शिळ्या अन्नापासून जनावरांना विषबाधा होऊ नये. सभागृह परिसरात दुर्गंधी पसरू नये, नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाच वर्षापासून बायोगॅसचा वापर सुरू आहे. सभागृहात काम करणारे कर्मचारी व पुजारी बायोगॅसचा वापर करून स्वयंपाक बनवतात. - अजय माहूरवार, अध्यक्ष कन्यका माता सभागृह कमिटी गोंडपिपरी.

शिळ्या अन्नामुळे होते जनावरांना विषबाधादरम्यान, कार्यक्रमानंतर साधारणतः तिथे जेवणाचा कार्यक्रम आटोपतोच. कार्यक्रम संपल्यानंतर पंगतीतील शिल्लक अन्न सभागृहाच्या मागील भागात टाकण्यात येते किंवा उघड्यावरील सार्वजनिक ठिकाणी हे अन्न टाकतात. अनेकदा ते अन्न खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. हा खेदजनक प्रकार असून, जेवणावळीनंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे याचे परिणाम ते अन्न खाणाऱ्याजनावरांच्या आरोग्यावर होत आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीचंद्रपूरअन्नातून विषबाधाअन्न