Join us

Agriculture News : 'शासन आपल्या दारी येईल' अशी आशा, मात्र अंध शेतकरी दाम्पत्याची ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 3:10 PM

Agriculture News : आजही अंध शेतकरी दाम्पत्य शासकीय आधारच्या प्रतीक्षेत शासन आपल्या दारी येईल याची वाट पाहत आहे. 

- गणेश शेवरे नाशिक : ना सरकारच्या ना कुणाच्या भरवशावर गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टी नसतानाही पांडुरंग धुमाळ (Pandurang Dhumal) बायकोसोबत शेती फुलवत आहे. मात्र आजही ज्या शासनाच्या योजना (Government Scheme) त्या या शेतकरी दाम्पत्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत. एकीकडे सरकार म्हणतंय 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) मात्र अद्यापही या अंध शेतकरी दाम्पत्याच्या दारी ना कुठली योजना ना कुठला शासकीय अधिकारी आला नाही. आजही हे दाम्पत्य शासकीय आधारच्या प्रतीक्षेत शासन आपल्या दारी येईल याची वाट पाहत आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे हे शेतकरी दाम्पत्य वास्तव्यास आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने पांडुरंग धुमाळ शाळेसोबत शेतीत काम करत आले आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी धुमाळ यांची दोन्ही डोळयांची दृष्टी गेली. त्यानंतर २००७ साली सविता हिच्याशी पांडुरंग यांचा विवाह झाला. सविता ,या देखील जन्मतः अंध असुन तिने मनोभावे पतीची साथ देत आपला संसार फुलवला. संसार फुलवता फुलवता दोन्ही दाम्पत्य दोन एकर द्राक्ष बाग स्वतःच करतात. यात आई सिंधुबाई या शेती कामात त्यांना मार्गदर्शन करत हातभार लावत आहे.

सांगायचं तात्पर्य एकच की आजही हे कुटुंब कुणाच्याही आधाराशिवाय शेती फुलवत आहे. मात्र पदरी एक मुलगा आहे, त्याचे शिक्षण आहे, घर मोडकळीस आले आहे. या गोष्टीसाठी शासनाच्या योजनांचा आधार का मिळू नये, असा केविलवाणा प्रश्न या दाम्पत्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन अनेक योजना राबवत असते. मात्र त्या योजना खरंच शेतकऱ्यापर्यंत पोहचता का? हा गहन प्रश्न आहे. अशीच परिस्थिती अंध दाम्पत्य सविता व पांडुरंग यांच्यावर आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यापासून हे शेतकरी दाम्पत्य देखील मदतीच्या अपेक्षेत असताना त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. 

शेतीची प्रचंड आवड दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली असताना पांडुरंग शेतीसोबत इतरही कामे करतात. असंच ते एकदा दळण घेऊन येत असताना रस्त्याचे काम चालू होते. मात्र याचवेळी तापलेल्या डांबराच्या बादलीत पांडुरंग यांचे दोन्ही पाय पडले, त्यावेळी ते वर्षभर अंथरूनावर पडुन होते. त्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने दोन्ही दाम्पत्य शेतीत गुंतले असून द्राक्ष शेतीबरोबरच टोमॅटो आणि कांदा पिके देखील घेत आहेत. 

दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रनाशिकनिफाडद्राक्षे